चिंताजनक स्थितीत लसीकरणाला होणारी गर्दी दिलासादायक! ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी रांगा, तर ग्रामीण भागात फारसा जोर नाही

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे तालुक्यातील कोविड बाधितांच्या संख्येत दररोज मोठी भर पडत असताना दुसरीकडे लसीकरणाला होत असलेली गर्दी चिंताजनक वातावरणातही समाधानाचे दर्शन घडवणारी ठरली आहे. घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चार खासगी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण सुरू आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 5 हजार 505 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात गेल्या 1 मार्चपासून केंद्राने जाहीर केलेल्या दुसर्‍या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिक व आजारी असलेल्या 534 व्यक्तींचा समावेश आहे. आजही घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मोठी गर्दी असल्याचे दिसून आले.

संगमनेर तालुक्यासह अहमदनगर व राहाता तालुक्यातील काहींनी कोविडच्या नियमांची आणि निर्बंधांची पायमल्ली करुन आपल्या पाल्यांचे विवाह सोहळे धूमधडाक्यात साजरे केल्याने आणि अशा सोहळ्यांना निमंत्रितही कोविडचे संकट विसरुन शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याने या तिनही तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच कोविड रुग्णालये पुन्हा रुग्णांनी तुडूंब भरल्याचे चित्र आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर असल्याने जिल्ह्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले असून जिल्हा पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे.

एकीकडे वाढत्या रुग्णसंख्येने चिंता निर्माण झालेली असताना दुसरीकडे गेल्या 1 मार्चपासून लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजारी व्यक्तिंना ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालय व शहरातील चार खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यात ग्रामीण रुग्णालयातून आत्तापर्यंत 534 जणांचे लसीकरण करण्यात आले असून त्यात 484 ज्येष्ठ नागरिक तर पन्नासजण 45 वर्षांवरील आजारी श्रेणीतील असल्याने त्यांना लस देण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांसह फ्रंटलाईन वर्कर आणि दुसर्‍या टप्प्यातील सामान्य व्यक्ती गृहीत धरुन तालुक्यातील 5 हजार 505 जणांचे आजवर लसीकरण झाले आहे. त्यातील 3 हजार 441 जणांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातून तर उर्वरीत 2 हजार 64 जणांना तालुक्यातील दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस देण्यात आली आहे. ग्रामीणभागाच्या तुलनेत शहरीभागात लसीकरणाचा उत्साह अधिक असून नागरिक रांगा लावून लस घेत आहेत. ग्रामीणभागात मात्र लसीकरणाचा वेग खूपच कमी असल्याचे प्राप्त आकडेवारीतून दिसून येते.

गेल्या 1 मार्चपासून तालुक्यातील कोविडचे संक्रमण पुन्हा वाढले असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. अशा स्थितीत नागरिकांच्या मनात पुन्हा भीतीने घर केले असून लॉकडाउनबाबतही शंका निर्माण झाल्या आहेत. त्यातून संपूर्ण तालुक्यात चिंतादायक वातावरण असतांना लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद दिलासादायक चित्र दाखवित आहे.

Visits: 82 Today: 2 Total: 1106501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *