महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा केंद्राचा डाव ः तनपुरे

नायक वृत्तसेवा, राहुरी
महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. भविष्यात अदानी-अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या ताब्यात महावितरणची सूत्रे गेल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शेतकरी हितासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, नितीन बाफना, सरपंच संजय खरात, डॉ. राजेंद्र बानकर, नंदकुमार तनपुरे, धीरज पानसंबळ, बन्सी औटी, ईश्वर कुसमुडे, सचिन ठुबे, दादासाहेब हापसे, बाळासाहेब देशमुख उपस्थित होते. पुढे बोलताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, राज्यात महावितरण कंपनीची 60 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते. ऊर्जा खाते आव्हानात्मक आहे. परंतु, शेतकर्‍यांची सेवा करण्यासाठी ऊर्जा खाते घेतले आहे. शेतकर्‍यांसाठी दीर्घकाळ सुविधा पुरविण्यात याव्यात. यासाठी नवीन वीज धोरण आखले आहे. शेतकर्‍यांच्या थकीत वीजबिलात सवलत देऊन दंड माफ केला. 65 टक्क्यांपर्यंत बिलात माफी दिली. त्याचा लाभ घेऊन वीजबिल भरुन सहकार्य करावे. मतदारसंघातील एकही रोहित्र ओव्हरलोड राहणार नाही, असे काम आगामी काळात करणार असल्याचा विश्वासही मंत्री तनपुरे यांनी शेवटी व्यक्त केला.

Visits: 171 Today: 1 Total: 1804121

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *