रेखा जरे हत्याकांड; मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अखेर हैद्राबादमधून अटक! मदत करणार्‍या आरोपींनाही केली अटक; पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

नायक वृत्तसेवा, नगर
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड सावेडी, नगर) हा हैद्राबादमधील बिलालनगर या गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भागात लपून बसला होता. पीएचडीची पदवी घेण्यासाठी तो उस्मानिया विद्यापीठात असताना झालेल्या ओळखीच्या आधारे तो या भागात लपून बसला होता. गुन्हेगारांना आश्रय देणार्‍या तेथील एका वकिलानेच त्याला यासाठी मदत केली होती. शेवटी नगरच्या पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यासह मदत करणार्‍या आरोपींनाही अटक केली. आधुनिक तंत्रज्ञानालाही गुंगारा देत सराईत गुन्हेगाराप्रमाणे आरोपी लपून बसला होता.

गुन्हेगारी कथानकावर आधारित एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीचा हा घटनाक्रम आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि तपास अधिकारी उपअधीक्षक अजित पाटील यावेळी उपस्थित होते. तीन आरोपींना कालच अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीला सकाळी अटक करण्यात आली आहे. त्याला घेऊन पोलीस पथक नगरला निघाले असून आरोपीला दुपारनंतर पारनेरच्या न्यायालयात हजर केले जाईल.
गेल्या वर्षी 30 नोव्हेंबरला जरे यांची हत्या झाली होती. या गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार झाला. काही दिवस इतरत्र राहिल्यानंतर त्याने हैद्राबाद गाठले. पूर्वी त्याने याच भागातील उस्मानिया विद्यापाठातून पीएचडी मिळविलेली आहे. त्यावेळी तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा.सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगणा) या वकीलाशी त्याची ओळख झाली होती. गुन्हेगारांना आश्रय देऊन हवी ती मदत मिळवून देण्यासाठी हा वकील कुप्रसिद्ध आहे. त्याचीच मदत बोठेने घेतली. चंद्रप्पा याने त्याला बिलालनगर या गुन्हेगारांच्या लपण्याच्या कुप्रसिद्ध भागात ठेवले होते. पोलिसांना पक्की खबर मिळाली तेव्हा पोलीस याच भागातील प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर गेले. त्यातील रूम नंबर 109 मध्ये बोठे लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने तेथे बी. बी. पाटील या नावाने बुकिंग केलेले होते. ओळख लपविण्यासाठी तो दाढी वाढवून आणि वेष बदलून वावरत होता. मात्र, तो तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि बोठे पकडला गेला.

भल्या सकाळी ही कारवाई करण्यात आली. रुममध्ये बोठे एकटाच होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय त्याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय 25 रा.गुडूर करीमनगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30 रा.बालापूर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्र प्रदेश), अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (वय 52, रा.चारमिनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्र प्रदेश) यांना अटक करण्यात आली, तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा.हैद्राबाद) ही महिला फरार आहे. बोठे याला नगरमधून मदत करणारा महेश वसंत तनपुरे (वय 40, रा.कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, नगर) याला आज सकाळी अटक करण्यात आली. तनपुरे हा बोठेशी नगरमधून संपर्कात राहत होता व येथून मदत करीत होता, अशी माहिaती तपासात पुढे आली आहे.

बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरार असल्याच्या काळात त्याने अनेक मोबाईल वापरले. त्यातील एक मोबाईल नंबर तर 2011 मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरलेला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत सुमारे शंभरहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबविली. हैद्राबादमध्ये तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलीस पोहोचण्यापूर्वी पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने दाढी वाढविली आहे. वेषांतर केले आहे. शिवाय तो बी. बी. पाटील या नावाने वावरत होता.

अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला गुंगारा देत बोठे फरार झाला होता. शेवटी पोलिसांनीही अत्यंत गोपनीयता पाळत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस सायबर सेलची मदत घेऊन सूत्रबद्धरित्या तपास केला. पथकातील पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन मोहीम फत्ते केली. जरे यांनी बोठेबद्दल पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या गुन्हाही दाखल करण्याच्या तयारीत असल्याने आणि त्यातून आपली बदनामी होऊ नये, या कारणावरून बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. पाच आरोपी यापूर्वीच अटक करण्यात आले आहेत. आता त्याला मदत करणारे आणखी कोणी उघड झाले, तर त्यांनाही अटक केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.


गेल्या शंभर दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बाळ बोठे स्वतः विधीज्ञ आहे. असे असतानाही त्याने खूनाच्या सुपारीपासून ते प्रत्यक्ष खून होईस्तोवर सागर भिंगारदिवे आणि रेखा जरे यांच्याशी आपल्या मोबाईलवरुन अनेकवेळा संपर्क केला होता. त्यामुळे सागर भिंगारदिवेला अटक होताच तो पसार झाला. मात्र जातांना त्याने आपला मोबाईल घरीच ठेवला. त्यामुळे पोलिसांनी जंग जंग पछाडूनही त्याचा सुगावा लागत नव्हता. मात्र कालचा शुक्रवार पोलिसांसाठी तीन महिन्याचा पाठलाग थांबवणारा ठरला. कितीही कठोर असला तरी बोठेही एक माणूसच आहे. त्याच मोहात त्याने आपला 21 वर्षीय मुलगा यश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल (ता.12) फोन केला आणि वकील असलेला बोठे फसला. बोठेचा फोन सुरु असतानाच तपास पथकाच्या अधिकार्‍यांनी मिळालेल्या लोकेशच्या दिशेने कूच केली आणि गेल्या शंभर दिवसांपासून पसार असलेल्या बाळ बोठेला आज पहाटे सहाच्या सुमारास जेरबंद करण्यात आलं.

तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये ज्याठिकाणी बाळ बोठे वास्तव्यास होता तो बिलालनगरचा संपूर्ण भाग गुन्हेगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. सामान्य माणसांचे या भागात फिरकणेही अशक्य, अशा ठिकाणावरील एका लॉजमध्ये तो वास्तव्य करीत होता. हैद्राबाद पोलिसांच्या मदतीने नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे त्याला ताब्यात घेतांना त्याला मदत करणार्‍या चौघांवरही गुन्हे दाखल केले. त्यातील महिला आरोपी पसार झाली. मात्र उर्वरीत तीनही आरोपींना ताब्यात घेवून हैद्राबादहून नगरला आणण्यात आले आहे. संपूर्ण तेलंगणामध्ये हैद्राबादचा बिलालनगर भाग गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी जावून पोलिसांनी केवळ बोठेच नव्हे, तर तेथील स्थानिक तिघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Visits: 111 Today: 1 Total: 1107987

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *