किरकोळ कारणावरुन शेजार्यांमध्ये वादाची ठिणगी! बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी; दोन्ही बाजूकडून विनयभंगाचा गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेजार्यांशी असलेले संबंध नेहमीच आंबट-गोड स्वरुपाचे असतात, मात्र हेच संबंध जर सौहार्दपूर्ण असतील; तर आपण अधिक प्रसन्न आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतो. देशात कधीकाळी अस्तित्त्वात असलेल्या वाडासंस्कृतीची जागा आज ओनरशिपने घेतली आहे, त्यातून शेजार्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही काहीसे ताणले गेले आहेत. शेवटी ज्यांची जागा आपण बदलू शकत नाही, अशा शेजार्यांशी घातलेल्या वादातून पश्चाताप सोडून काहीच हाती येत नाही हे सर्वश्रृत असतांनाही संगमनेरातील एका मोठ्या व्यापार्याने आपल्या शेजार्याशी वाद घातल्याने त्याचे परिणाम त्या दोघांवरही परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात झाला. विशेष म्हणजे या भांडणात दोघांच्या अर्धांगिणींनीही मोलाची भूमिका बजावल्याने त्यांच्या पतींविरोधात विनयभंगाचेही कलम लावण्यात आहे. हा प्रकार बाजारपेठेतील पानसरे गल्ली परिसरात मंगळवारी सकाळी घडला.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठेतील पानसरे गल्लीत राहणार्या एका 36 वर्षीय महिलेने याबाबत पहिली तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित महिला आपल्या घरात नेहमीचे काम करीत असताना त्यांच्या शेजारी राहणारे बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी अचानक त्यांच्या दारासमोर आले व फिर्यादी असलेल्या महिलेस शिवीगाळ करु लागले. यावेळी सदर महिलेने घराबाहेर येवून ‘तुम्ही मला शिवीगाळ का करीत आहात?’ असा सवाल विचारला असता ‘त्या’ व्यापार्याने थेट फिर्यादीच्या अंगावर धाव घेत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी त्यांनी महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यही केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

हा प्रकार सुरु असतानाच सदरच्या व्यापार्याच्या पत्नीनेही आपल्या पतीला साथ देतांना फिर्यादी महिलेस मारहाण केली व त्या दोघांनीही फिर्यादी व त्यांच्या पतीस ‘तुम्हास जीवे ठार मारु’ अशा प्रकारची धमकीही दिली. यानंतरही या जोडप्याने फिर्यादीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांचे कपडे फाडले. यावेळी सदरचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे पती मध्ये पडले असता त्यांनाही ‘त्या’ दोघांनी मारहाण करीत त्यांच्या पाठीला, डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ व उजव्या हाताच्या मनगटाला चावा घेवून त्यांना दुखापत केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी ‘तो’ व्यापारी व त्यांच्या पत्नीच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 354 (ब) सह 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पो.हे.कॉ.रफीउद्दीन शेख यांच्याकडे सोपविला.

सायंकाळी उशिराने संबंधित व्यापार्याच्या पत्नीनेही शहर पोलीस ठाणे गाठून सकाळी घडलेल्या प्रकाराबाबत आपली कैफीयत मांडली. त्यानुसार या प्रकरणात साक्षीदार असलेली एक व्यक्ती त्या व्यापार्यास झाडलोट करुन रस्त्याच्या एकाबाजूला जमा केलेला कचरा दाखवित होते. यावेळी पहिल्या फिर्यादीतील महिलेचा पती तेथे येवून आपल्या हातातील पोते झटकू लागला. त्यावरुन सदर व्यापार्याने ‘इथे पोते कशासाठी झटकता आहात?’ असा सवाल करीत ‘येथे खराब करु नका’ असे सांगू लागले. त्याचा राग येवून त्यांनी थेट त्या व्यापार्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरु असतांनाच त्याची पत्नीही तेथे आली व त्यांनी आपल्या पायातील चप्पल काढून त्या व्यापार्याच्या तोंडावर मारली.

हा सगळा प्रकार सुरु असताना या प्रकरणातील फिर्यादी असलेल्या त्या व्यापार्याच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेच्या पतीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची कृती केली. या झटापटीत त्या व्यापार्याच्या पत्नीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही गहाळ झाल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या इसमासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 354 (ब) सह 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा करुन पुढील तपासही पो.हे.कॉ.रफिउद्दिन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

बंद दरवाजे ही आपल्या देशाची संस्कृती नाही; पण ‘शेअरिंग’ आणि ‘एकत्र कुटुंब पद्धती’ या दोन्ही गोष्टी आपल्या जगण्यातून हद्दपार होत असल्याने ‘चांगले शेजारी’ असण्याची गरज निर्माण होवू लागली आहे. शेजारधर्म पाळताना दोन्ही बाजूने संवाद आणि चांगले संबंध ठेवण्यासाठी पुढाकार गरजेचा आहे. बंद दरवाजा संस्कृतीने आणलेली असुरक्षितता, तणावपूर्ण संबंध, किरकोळ गोष्टींवरुन वाद अथवा भांडणं या सगळ्या गोष्टी टाळता येवू शकतात, मात्र दुर्दैवाने दिवसेंदिवस अशा वादाच्या गोष्टींमध्ये वाढच होताना दिसत आहे.

