तळेगावमधील पुलावर कार व पिकअपचा अपघात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील तळेगाव दिघे गावातील बाजारतळाच्या नजीक असणार्‍या अरुंद पुलावर पुन्हा कार व पिकअपची धडक होऊन अपघात झाल्याची घटना गुरुवारी (ता.5) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक बालंबाल बचावले. यावरुन हा पूल अपघात क्षेत्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लोणीकडून नाशिकच्या दिशेने जाणारी इंडिगो कार व लोणीच्या दिशेने जाणार्‍या पिकअपची तळेगाव बाजारतळानजीकच्या पुलावर धडक झाली. या अपघातात कारचालक सतीश गोसावी व पिकअप चालक (नाव समजू शकले नाही) दोघेही बालंबाल बचावले. या घटनेनंतर युवक कार्यकर्ते अमोल दिघे यांच्यासह इतरांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत मदत केली. अपघातानंतर पिकअप चालक वाहन घेऊन निघून गेला. तर इंडिगो कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील अरुंद पूल असल्याने हे ठिकाण अपघातप्रवण म्हणूनच अनेकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे व पुलाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी युवक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *