जंगली श्वापदांची तस्करी करणारी टोळी संगमनेरात पकडली..!  पुणे वनविभागाची साताऱ्यापासून पाठलाग करीत खंदरमाळ शिवारात कारवाई..

नायक वृत्तसेवा, घारगाव
जंगली प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची व काही दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करणारी मोठी टोळी पुणे वन विभागाने आज सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील खंदरमाळ शिवारात पाठलाग करीत पकडली. या कारवाईत संबंधित तस्करांकडून अत्यंत दुर्मिळ असलेले खवले मांजर व अस्सल वाघ नखे हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील साकुर येथील तिघा तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून जंगली श्वापदांची शिकार व तस्करी करणारी मोठी आंतरराज्य टोळी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज (ता.13) सकाळी सातारा येथे अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या खवले मांजराचा व्यवहार होणार असल्याची माहिती पुणे येथील वन विभागाला समजली होती. त्यानुसार पुणे परिक्षेत्राचे दीपक पवार, सहाय्यक वनरक्षक मयूर बोठे यांच्यासह वनविभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सातारा गाठले. मात्र सदर कारवाईबाबत तस्करांना संशय आल्याने त्यांनी व्यवहाराचे ठिकाण बदलीत पुणे गाठले. मात्र वनविभागाचे पथक सातत्याने त्यांच्या पाठलागावर होते. त्यामुळे संबंधित तस्करांनी पुणे-नाशिक महामार्गाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात प्रवेश केला.
घारगाव जवळील खंदरमाळ शिवारात त्यांचे वाहन आले असता वनविभागाच्या पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र संबंधित तस्करांनी त्यांची नजर चुकवून आडवळणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खंदरमाळ शिवारात चोर-पोलीस असे दृश्य दिसू लागले. या कारवाईत वनविभागाच्या मदतीला डोळासणे  महामार्ग पोलीस पथकाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, रामनाथ कजबे, पत्रकार राजू नरवडे व ग्रामस्थांनीही वन विभागाला सहकार्य करीत तस्करांचा पाठलाग सुरू केला. जवळपास अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर पाचपैकी तिघे तस्कर वनविभागाच्या हाती लागले.
त्यांच्याकडून अत्यंत दुर्मिळ समजले जाणारे एक खवले मांजर व अस्सल वाघ नखांसह बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे. या तिघांनाही ताब्यात घेऊन वनविभागाने पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. पकडण्यात आलेले तीनही तस्कर संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या वृत्ताने सातारा पुणे व अहमदनगर या तीनही जिल्ह्यात खळबळ उडाली असून पकडण्यात आलेल्या तस्करांच्या चौकशीतून जंगली प्राण्यांची शिकार व त्यांच्या अवयवांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Visits: 242 Today: 2 Total: 1113375

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *