वंचितकडून होणार महाविकास आघाडीची गोची! लोखंडे पुन्हा लाटेच्या भरवशावर; तर, वाकचौरेंची भिस्त थोरातांच्या यंत्रणेवर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जसा जवळ येवू लागला आहे, तशी निवडणुकीतील रंगत वाढू लागली आहे. सुरुवातीला शिर्डीत सरळ लढत होण्याचा अंदाज असताना वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत पूर्वाश्रमीच्या काँग्रेस कार्यकर्त्या उत्कर्षा रुपवते यांनी सगळा खेळ बिघडवला आहे. विद्यमान खासदारांच्या ‘गायब’ भूमिकेतून मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी उबाठाच्या उमेदवाराला फायद्याची ठरेल असा सुरुवातीचा कयास होता. मात्र निवडणुकांच्या तारखा जवळ येतायेता त्यातही आता आमुलाग्र बदल होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभांनी राज्यातून जवळजवळ परतलेली मोदी लाट पुन्हा उसळू लागली आहे. त्यामुळे शिर्डीच्या स्पर्धेतून सुरुवातीला बाद ठरण्याची शक्यता निर्माण झालेले विद्यमान खासदार पुन्हा लाटेवर स्वार झाल्याचे चित्रही बघायला मिळत आहे. अशा स्थितीत प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या आघाडीच्या उमेदवाराचे धाबे दणाणले असून वंचितच्या उमेदवाराने त्यांची गोची केली आहे. तर महायुतीच्या उमेदवारासाठी एकीकडे ‘प्रवरे’ची यंत्रणा जीव तोडीत असताना दुसरीकडे आघाडीच्या उमेदवाराची संपूर्ण भिस्त असलेल्या बाळासाहेब थोरातांची यंत्रणा मात्र नगरमध्ये व्यस्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी लोकसभेची निवडणूक वेगवेगळ्या राजकीय घडामोडींनी सुरुवातीपासूनच राज्याच्या केंद्रस्थानी आहे. मात्र त्याचवेळी अहमदनगर दक्षिणमध्ये विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र डॉ.सुजय विखे पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यातील लढत राज्यातील लक्ष्यवेधी तर जिल्ह्यातील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीला मिळाव्यात याची संपूर्ण जबाबदारी महसूलमंत्री विखे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपले सुपूत्र निवडणुकीच्या रिंगणात असतानाही उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागांमध्ये समन्वय साधून आपल्या यंत्रणेची विभागणी करुन जोरदार कामही सुरु केले आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी त्यांनी घेतलेल्या सभाही खूपकाही सांगून जाणार्या आहेत.

त्याचवेळी दुसरीकडे गेल्या दहा वर्षात वारंवार पक्षांतर केलेले आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठी कार्यकर्त्यांचा दुष्काळ स्पष्टपणे बघायला मिळत असून उबाठा गटातील अंतर्गत गटबाजीचा मोठा फटकाही त्यांना सहन करावा लागत आहे. त्यातच त्यांची संपूर्ण भिस्त माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरच असल्याचेही लपून राहिलेले नाही. मात्र थोरातांचे पवारांशी असलेले राजकिय सख्य पाहता प्रतिष्ठेच्या बनलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातच त्यांचा अधिक रस असल्याचेही स्पष्ट असून जिल्ह्यात दुसर्या क्रमांकाची मानली जाणारी थोरातांची निवडणूक यंत्रणा सध्या नीलेश लंके यांच्यासाठी दिवसरात्र एक करीत असल्याचेही दिसत आहे. अशावेळी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे एकाकी पडतात की काय असेच काहीसे चित्र शिर्डीत निर्माण झाले आहे.

त्यातही वंचित बहुजन अराघाडीने अनपेक्षितपणे उत्कर्षा रुपवते यांना पक्षप्रवेश देवून लागलीच शिर्डीची उमेदवारीही दिल्याने वाकचौरेंची डोकेदुखी वाढली असून रुपवतेंना पडणारी बहुतेक मते त्यांच्या कोट्यातूनच कापली जाण्याचा अंदाज आहे. वास्तविक वंचितचा पंतप्रधान मोदींना असलेला विरोध आजवर कधीही ठळकपणे दिसून आलेला नाही. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपच्या ‘बी’ टीमचा आरोप झाला आहे. मतदारांच्या मनात तो रुजू नये यासाठी वंचित प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काही जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचा दिखावा करीत राहिलेल्या बहुतेक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. त्याचा थेट फटका महाविकास आघाडीलाच बसणार असल्याचेही स्पष्ट आहे.

विशेष म्हणजे गेल्याकाही दिवसांत वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी प्रचारातही आघाडी घेतली असून प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या टप्प्यात त्या भारी पडल्या आहेत. वातावरण निर्मितीसाठी त्यांच्याकडून माध्यमांशी सलगीही अनुभवायला मिळत असून त्यासाठी लागणारी मोठी रसदही त्यांच्याकडे पोहोचल्याची जोरदार चर्चा असल्याने त्यांची उमेदवारी कोणाचा बळी घेणार याच्याच खुमासदार चर्चा सध्या शिर्डी लोकसभा मतदार संघात रंगल्याचे दिसत आहे.

यापूर्वीच्या दोन निवडणुकांप्रमाणे यावेळी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे चित्र आघाडीच्या स्टार प्रचारकांकडून निर्माण केले गेले होते, मात्र गेल्या दोन्ही टप्प्यांसह तिसर्या आणि चौथ्या टप्प्यात पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एकामागून एक सभांचा धडाका सुरु झाल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून मोदी लाट पुन्हा आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तिसर्या टप्प्यापासूनच्या उर्वरीत टप्प्यांमधील निवडणुकांमधील चुरस वाढली असून अनेक ठिकाणच्या आघाडीच्या उमेदवारांची हृदयगती वाढली आहे, त्यात शिर्डीचाही समावेश झाला आहे.

