आंतरराज्य ‘गांजा’ तस्करीचे ‘संगमनेर’ कनेक्शन..! मुंबईच्या गुन्हे शाखेकडून शहरातील एकाची कसून चौकशी; स्थानिक पोलिस मात्र अनभिज्ञच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

ओडिशातील कंधमाळ येथून महाराष्ट्रातील विविध महानगरांमध्ये गांजाचा पुरवठा करणारी आंतरराज्य टोळी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून या टोळीच्या सूत्रधारासह राज्यातील वाहतूकदाराचे नाव समोर आले आहे. त्यासोबतच वाहतुकीदरम्यान ठिकठिकाणी झालेल्या गांजाच्या वितरणाचे ओघळ संगमनेरपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले असून, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी रात्री शहरातील एकाची कसून चौकशी केल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. या वृत्ताला स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला असला तरीही, या कारवाईबाबत त्यांच्याकडेही तोकडी माहिती असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी संबंधित इसमाला ताब्यात घेतल्याचीही जोरदार चर्चा असून या वृत्ताला मात्र दुजोरा मिळालेला नाही.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक लता सुतार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी जवळ सापळा रचून शुक्रवारी संध्याकाळी शहाळे वाहतूक करणारा टेम्पो अडवला. त्याची कसून तपासणी केली असता त्यात शहाळ्यांच्या खाली जवळपास साडेतीन कोटी रुपये मूल्य असलेला 1 हजार 800 किलो गांजा दडवलेला आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक आकाश यादव व भिवंडी येथील गोदामावर सदर गांजा उतरवून घेण्याची जबाबदारी असलेला दिनेश कुमार सरोज उर्फ सोनू या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून ठाण्याच्या लुईसवाडीत राहणारा संदीप सातपुते हा इसम गांजा वाहतुकीचे काम पहात असल्याचे समोर आले. तर या संपूर्ण कृष्णकृत्याचा सूत्रधार ओडिशा येथील प्रधान असे नाव असलेली व्यक्ती समोर आली.

राज्यातील गांजा पुरवठ्यासाठी ओडिशा मधून गांजा आणण्याची वाहतूक व्यवस्था संदीप सातपुते सांभाळीत होता. त्यासाठी तो भिवंडी येथून शहाळे आणण्याच्या नावाखाली भाड्याने टेम्पो घ्यायचा. मात्र सदर टेम्पोवर स्वतःचा चालक यादव व एक साथीदार अशा दोघांना ठेवायचा. हे दोघे टेम्पो घेऊन ओडिशा व आंध्र प्रदेश सीमेवरील तिरुर येथे जायचे. तेथे प्रधान याची माणसे त्या दोघांचे मोबाईल ताब्यात घेऊन टेम्पो घेऊन जायचे व चार दिवसांनी जवळपास पाच हजार किलो गांजा भरून तो टेम्पो पुन्हा घेऊन तिरुर येथे येत. तेथे आल्यावर टेम्पोत अधिकृतपणे शहाळे भरले जात व त्याखाली गांजाची पोती दडवून त्याची वाहतूक हैदराबाद, महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे या मार्गाने मुंबई पर्यंत केली जात. या दरम्यानच्या प्रवासात राज्यातील विविध ठिकाणी गांजाचे वितरणही केले जात असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर जेथे जेथे गांजाचे वितरण होत, तेथे तेथे वाहनाचा चालक व त्याचा साथीदार अशा दोघांचीही बदली होत. यावरुन हा व्यवसाय किती पद्धतशीरपणे सुरु याचा अंदाज येतो. 

सदरचा टेम्पो तिरुरहून शहाळे घेवून निघाला तेव्हा त्यात पाच हजार किलो गांजा होता. मात्र मुंबई पोलिसांच्या हाती लागला तेव्हा, त्यात केवळ 1 हजार 800 किलो गांजा आढळून आला. याचा अर्थ या प्रवासादरम्यान त्याने मार्गातील अनेक ठिकाणी जवळपास 3 हजार 200 किलो गांजाचे वितरण केल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार त्याची जुळवाजुळव करताना त्या तपासाचे ओघळं संगमनेरपर्यंत येऊन पोहोचले. त्यासाठी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.13) रात्री संगमनेर शहराच्या पूर्व भागातील एकाची सखोल चौकशी केल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. त्यामुळे रस्त्यात वितरीत झालेला यातील किती गांजा संगमनेरात आला याविषयी तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले आहेत. या कारवाई विषयी शहर पोलिसांकडे अत्यंत तोकडी माहिती आहे. ही चौकशी करताना मुंबईच्या गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांची कोणतीही मदतही घेतली नाही व कारवाई बाबत डायरीला कोणतीही नोंदही केलेली नाही. त्यामुळे या कारवाईबाबत संगमनेर शहर पोलीस अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले. या प्रकरणात शहरातील संबंधित व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुंबई पोलिसांची ही कारवाई गांजाची आंतरराज्य टोळी उघड करणारी आहे. त्याच्या तपासाचे ओघळं संगमनेर शहरापर्यंत येऊन पोहोचल्याने गांजासाठी आधीच बदनाम असलेल्या संगमनेरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

जिल्ह्यात पूर्वी कोल्हार येथून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी चालत. मात्र काही वर्षापूर्वी पोलिसांनी कोल्हार मधील गांजा तस्करीची पाळेमुळे खोदून काढली. त्यामुळे तेथील धंदा पूर्णतः उद्ध्वस्त झाला. मात्र त्यानंतर संगमनेर शहरानजीक असलेल्या कासारवाडीचे नाव गांजा तस्करीत पुढे आले. त्यासोबतच गेल्यावर्षी संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणखी तिघा तस्करांंची संगमनेरकराना ओळख झाली. आतातर आंतरराज्य टोळीशी संबंधित असल्याच्या संशयावरून संगमनेर शहरातील एकाची थेट मुंबईच्या गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्याने गांजा तस्करीत संगमनेरचे स्थान किती मोठे असू शकते याविषयी संगमनेरात चर्चांना उधाण आले आहे.

Visits: 176 Today: 2 Total: 1114032

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *