आंबीखालसा फाट्यावर अपघात; एक ठार, एक जखमी! सततच्या अपघातांमुळे ग्रामस्थ संतप्त; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही अपघाताची घटना मंगळवारी (ता.1) सायंकाळी घडली आहे. दरम्यान, वारंवार होणार्‍या अपघातांमुळे आंबीखालसाचे ग्रामस्थ आता चांगलेच संतप्त झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भुरा गंगाधर माळी (वय 60) व त्यांचा मुलगा गटलू भुरा माळी (वय 35 वर्षे रा.देवळाणे ता.सटाणा जि.नाशिक) हे दोघे बापलेक दुचाकीवरून (क्र. एमएच.15, एडी.7810) घारगाव मार्गे पुण्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यावरील गतिरोधकावर आले असता त्याचवेळी टेंपोही (क्र. एमएच.14, जेएल.9097) मागून येत होता. यावेळी झालेल्या दुचाकीचे चालक भुरा माळी यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. तर मुलगा जखमी झाला.

सदर अपघात झाल्याचे समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, नारायण ढोकरे, मनेष शिंदे, सुनील साळवे, अरविंद गिरी, नंदकुमार बर्डे, योगीराज सोनवणे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर लाड, अनिल भांगरे, नामदेव बिरे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. दरम्यान, आंबीखालसा फाट्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागले असून अनेकजण गंभीर जखमी हाते आहे. याचबरोबर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी याठिकाणी संबंधित विभागाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, माजी सरपंच सर्जेराव ढमढेरे, बाळासाहेब गाडेकर, संतोष घाटकर, सुरेश गाडेकर यांसह आदिंनी दिला आहे.

Visits: 173 Today: 1 Total: 2166331

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *