वरवंडीमध्ये बंदोबस्तावर असणार्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्यांना धक्काबुक्की आश्वी पोलिसांत तेरा जणांवर गुन्हा दाखल तर अकरा जणांना अटक; दोघे फरार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावच्या कारभाराची धुरा हातात घेण्यासाठी नुकत्याच सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी पार पाडल्या. मात्र, या निवडी प्रसंगी संगमनेर तालुक्यातील वरवंडीमध्ये गालबोट लागल्याची घटना घडली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलिसांना जमावातील काही समाजकंटकांनी शिवीगाळ करत धक्काबुकी केली आहे. या प्रकरणी आश्वी पोलिसांत तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतची निवडणूक पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. नुकतीच सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया देखील पार पडली. दरम्यान, वरवंडीमध्ये निवड प्रक्रियेला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. संरपच व उपसरपंच निवडीप्रसंगी दोन गटांत उमेदवार पळवापळवीचा सिलसिला सुरू झाल्याने गावात तणावयुक्त वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी काही कर्मचार्यांना सोबत घेऊन बंदोबस्त ठेवला होता.

मात्र पोलिसांमुळे आपले मनसुबे साध्य करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे हेरुन ग्रामस्थ अशोक रोहिदास गागरे व राजाबापू नानासाहेब वर्पे यांनी चिथावणीखोर भाष्य करुन जमाव निर्माण केला. याचे पर्यावसान थेट पोलीस उपनिरीक्षकांसह पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यापर्यंत झाले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अशोक रोहिदास गागरे, राजाबापू नानासाहेब वर्पे, संपत बाजीराव भोसले, सुभाष रोहिदास गागरे, बाबासाहेब तुकाराम हारदे, किरण सावळेराम उगले, अनिल लक्ष्मण उगले, विलास सोपान वर्पे, सोमनाथ हरिभाऊ गागरे, शिवाजी लक्ष्मण गागरे, बाळासाहेब लक्ष्मण बकुळे, राहुल अशोक गागरे, इंदूबाई अण्णासाहेब वर्पे (सर्व रा.वरवंडी) आदिंसह तेरा जणांवर सरकारी कामात अडथळा, दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुकी केल्याबद्दल गु.र.नं. 25/2021 भादंवि कलम 353, 332, 504, 506, 143, 149, 109 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील अकरा जणांना अटक केली आहे तर दोघे फरार झाले आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली आणि जखमी पोलिसांची विचारपूस केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
![]()
एकीकडे जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास जीवावर उदार होवून कर्तव्य बजावणारे पोलीस कुटुंबाचीही पर्वा करत नाही. तर दुसरीकडे याच रक्षकांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहे. बंदोबस्तासाठी तैनात असणार्या अधिकार्यांसह पोलिसांना धक्काबुक्की होणे हा प्रकान अतिशय गंभीर असून कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचा प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांतून उमटत आहे.
