ओळख पटली मात्र मुद्देमालासह आरोपी ‘गायब’च! संगमनेरचे तेलडेपो फोडी प्रकरण; चोरट्यांची पोलिसांना हुलकावणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चक्क चारचाकी टेम्पोसह येवून अख्खं गोदामच लुटून नेण्याच्या संगमनेरच्या तेलडेपो फोडी प्रकरणात पोलिसांचे हात अद्यापही रिकामेच आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्‍न निर्माण करणार्‍या या घटनेचा तपास सध्या स्थानिक आणि जिल्ह्याच्या यंत्रणांद्वारा समांतर सुरु आहे. मात्र चोरट्यांचे वाहन नाशिकच्या दिशेने जावूनही टोलनाक्यावर पोहोचले नसल्याने तपास अडखळला आहे. या प्रकरणातील मोडस ऑपरेंडी पाहता यामागे चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय असून त्यांच्या तपासासाठी राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाची (एनसीआरबी) मदत घेतली जात आहे. मात्र या घटनेला आता 24 तासांपेक्षा अधिक काळ लोटल्याने चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची आशा मावळली आहे. या घटनेने संगमनेरच्या व्यापारक्षेत्रात खळबळ उडाली असून व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


संगमनेरच्या गुन्हेगारी इतिहासात अलिकडच्या काळात क्वचितच घडलेल्या या अनोख्या आणि नियोजनबद्ध धाडशी घरफोडी प्रकरणात संगमनेर मर्चन्ट्स बँकेचे व्हा.चेअरमन मुकेश कोठारी यांचे अकोले रोडवरील ‘अरिहंत ऑईल डेपो’ नावाचे तेलाचे गोदाम फोडण्यात आले. मंगळवारी (ता.3) पहाटेच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या महिंद्रा पिक-अप वाहनासह आलेल्या चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या शटरचे कुलुप तोडून आंत प्रवेश केला व अवघ्या दीड तासांत गोदामातील 2 लाख 64 हजार रुपये किंमतीचे ‘नमस्ते’ पामतेलाचे 120 डबे, 99 हजार रुपये किंमतीचे सम्राट सूर्यफूल तेलाचे 45 व 72 हजार रुपये किंमतीचे जेमिनी तेलाचे 30 डबे अशा एकूण 4 लाख 35 हजार रुपयांच्या 195 तेलडब्यांसह 15 हजार मूल्याचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचा डीव्हीआर असा साडेचार लाखांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.


मंगळवारी पहाटे घडलेली ही घटना बाजूच्या एका फरशी कामगाराच्या जागृत अवस्थेत घडल्याने घटनेनंतर काही वेळातच दुकानाच्या मालकासह पोलिसांनाही त्याची माहिती मिळाली होती. मात्र पहाटेची वेळ आणि त्यात उन्हाचा पारा चढत असलेल्या महिन्यातील पहाटेचा गारवा यामुळे गारठलेली यंत्रणा जागी होण्यात वेळ गेल्याने चोरट्यांचे फावले. या प्रकरणाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास चोरट्यांनी वाहनासह येणे, गोदामाच्या शेजारीच राहणार्‍या फरशी कामगारांच्या गाळ्याला बाहेरुन अटकाव करणे, जाताजाता सीसीटीव्हीची मोडतोड करुन डीव्हीआर लांबवणे, वाहनासह नाशिकच्या दिशेने गेल्याचे भासवून मधूनच पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी रस्ता बदलणे या गोष्टीतून चोरट्यांना दुकानासह आसपासच्या भुगोलाचीही चांगलीच माहिती असल्याचे दिसून येते.


जिल्ह्यातील प्रगत बाजारपेठेचा मान मिरवणार्‍या संगमनेरात घडलेली ही घटना व्यापार क्षेत्राला हादरवणारी असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक पोलिसांसह अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेलाही (एलसीबी) या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शाखेच्या पथकाने आपल्या खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टिव्हेट करुन स्थानिक पोलिसांसह फोडलेल्या गोदामापासून चोरट्यांच्या वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यातून चोरटे मुद्देमालासह महामार्गाने नाशिकच्या दिशेने पसार झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांना हायसे झाले आणि चोरटे पकडलेच अशा अविर्भावात त्यांनी नाशिक जवळच्या शिंदे-पळसे येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्हीवर आपले डोळे खिळवले, मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही.


पोलिसांकडून टोलनाक्यावरील सीसीटीव्हीची तपासणी होणार याची पूर्वमाहिती असल्याने चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देत नांदूर शिंगोट्यानंतर आडवळणाचा रस्ता घेत पलायन केले. त्यामुळे दोन्ही यंत्रणा तूर्त हतबल झाल्या असून चोरट्यांचे वाहन गायब झालेल्या ठिकाणापासून नाशिकच्या दिशेने जाताना लागणार्‍या सर्व आंतररस्त्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यातूनही अद्याप काहीच हाती लागलेले नाही. त्यातच या घटनेला आता 24 तासांहून अधिक काळ लोटल्याने चोरटे राज्याची सीमा ओलांडून गुजरात अथवा मध्यप्रदेशात पोहोचले असण्याचीही दाट शक्यता आहे. या दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह गुन्हेगारांच्या मोडस ऑपरेंडीचे विश्‍लेषण करुन या प्रकरणामागे चोरट्यांची आंतरराज्य टोळी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.


त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाशी (एनसीआरबी) संपर्क साधला असून संशयीतांच्या छायाचित्रांवरुन त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यातून चोरट्यांची ही टोळी उत्तरप्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धास्तीने तेथील सराईत गुन्हेगारांनी आता उत्तरप्रदेश सोडून अन्यत्र अशा घटना घडवण्यास सुरुवात केल्याचे आता समोर येवू लागले आहे. तूर्ततः पोलिसांकडून आता तपासाची दिशा व्यापक करण्यात आली असली तरीही घटना घडून उलटलेला कालावधी पाहता चोरीला गेलेला मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता जवळपास धूसर झाली आहे.


ऐतिहासिक काळापासून संगमनेरच्या बाजारपेठेला मोठे महत्व आहे. आजच्या आधुनिक युगात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला असतानाही संगमनेरच्या बाजारपेठेने आपले महत्त्व कायम ठेवले आहे. कापडं, किराणा व भुसार माल, तेल-तुप, सुवर्णालंकार, दुचाकी व चारचाकी वाहने अशा सगळ्याच व्यवसायांनी येथील बाजारपेठ समृद्ध केली आहे. अशावेळी एखाद्या व्यापार्‍याचे चक्क गोदाम फोडून आत ठेवलेला अख्खा मुद्देमाल टेम्पोत भरुन गायब करण्याचा हा प्रकार पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करण्यासह व्यापार्‍यांच्या मनात धडकी भरवणारा आहे. त्याचा जलदगतीने तपास होवून आरोपी गजाआड जाण्याची आणि व्यापार्‍यांना दिलासा मिळण्याची गरज आहे.

Visits: 186 Today: 2 Total: 1761878

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *