डिग्रसमध्ये सैनिकाची काढली मिरवणूक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील डिग्रसचा युवक जितेंद्र बबनराव बिडगर हा सैन्यदलात भरती झाल्याने ग्रामस्थांसह मित्रपरिवाराने डी.जे.च्या तालावर देशभक्तीपर गीत वाजवत जितेंद्रची नुकतीच जंगी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या जयघोषात नाशिकला रवाना करण्यात आले.

घरापासून ते थेट गावच्या वेशीपर्यंत देशभक्तीपर गीत वाजवत मिरवणूक काढली. या दरम्यान, आईसह महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. या मिरवणुकीत गावातील लहान थोरांसह तरुण व महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर तरुणांनी दुचाकी रॅली काढून ठिकठिकाणी फलक लावले होते. यामुळे संपूर्ण गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन गेल्याचे दिसत होते. शेवटी देशसेवेसाठी रवाना होताना उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा निघाल्याचेही दृश्य होते. यापूर्वी डिग्रस गावातून देवराम खेमनर, विकास पुरी यांनी देशसेवा केली आहे. तर नवनाथ वावरे, सुंदर बिडगर, उत्तम खेमनर हे सध्या देशसेवा करत आहेत. या मिरवणुकीचे आयोजन जितेंद्रचे मामा बाळासाहेब होडगर, मित्र परिवार, डिग्रस तरुण मंडळ आदिंसह ग्रामस्थांनी केले होते.

Visits: 125 Today: 2 Total: 1106619

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *