आढळा धरण रविवारी भरणार…?
आढळा धरण रविवारी भरणार…?
पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठी आवक; लाभधारकांत आनंदाचे वातावरण
नायक वृत्तसेवा, अकोले
भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरुन प्रवरा नदीपात्रात विसर्ग झेपावू लागला आहे. तालुक्यातील ही मोठी धरणे भरुन गेल्यानंतर अवघी एक हजार साठ दशलक्ष घनफूट क्षमता असणारे आढळा धरण भरले नसल्याने लाभधारकांवर चिंतेचे मळभ दाटले होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून आश्लेषा आणि मघा नक्षत्रात कोसळधार सरींनी पाणलोट क्षेत्रात फेर धरल्याने पाडोशी व सांगवी व या लघू जलाशयांतून विसर्ग आढळाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहत आहे. यामुळे येत्या 24 तासांत (रविवारी) हस्त नक्षत्रात आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने ऐन गणेशोत्सवात विघ्नहर्ता बळीराजाला पावणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
अकोले तालुक्यातील उडदावणे, पांजरे, रतनवाडी, घाटघर, वाकी, भंडारदरा, हरिश्चंद्र गड, कळसूबाई आदी भाग पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे विक्रमी पावसाची नोंद होते. मात्र, यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने सर्वांचे अंदाज धुळीस मिळवले होते. त्याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला. यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला भंडारदरा धरण भरण्याची परंपराही यंदा अवघ्या एक दिवसाने खंडीत झाली. जून-जुलै या जोरदार पावसाच्या महिन्यांत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पाणलोट क्षेत्रासह लाभधारकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाच्या सरींनी सर्वत्र फेर धरल्याने पाणलोटातील ओढे-नाले तुडूंब भरुन धरणाच्या दिशेने वाहू लागले. यामुळे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणात पाण्याची मोठी आवक होत राहिली. भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरुन नदीपात्रात विसर्ग वाहू लागला. परंतु मुळा जलाशय अद्यापही भरलेला नसून खोर्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची धरणाच्या दिशेने आवक होत असल्याने मुळा धरणही लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आढळा पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाडोशी व सांगवी ही दोन्ही लघू जलाशये तुडूंब भरुन वाहू लागल्याने आढळा धरणात तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने लाभधारकांवर चिंतेचे मळभ दूर लोटले गेले आहेत. गेल्या 24 तासांत धरणात 64 पाण्याची आवक झाल्याने धरणाचा पाणीसाठा आज सकाळी सहा वाजेपर्यंत (शनिवार ता.22) 986 दलघफूट इतका झाला आहे.
आढळा खोर्यात यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कमी असल्याने पाणलोटातील उद्भव भरण्यास वेळ लागला. यामुळे खरीपाच्या पिकांनाही संजीवनी मिळते की असा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. मात्र, तीन-चार दिवसांपासून आश्लेषा आणि मघा नक्षत्रात कोसळधार सरींनी पाणलोट क्षेत्रात फेर धरल्याने पाडोशी व सांगवी व या लघू जलाशयांतून मोठा विसर्ग आढळाच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत धरण पूर्ण क्षमतेने आढळा नदीमध्ये विसर्ग धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे धरणावर अवलंबून असणारे देवठाण, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, वडगाव लांडगा, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, चिकणी, नळवाडी, निमगाव भोजापूर, राजापूर आदी लाभधारक गावांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*गेल्या 24 तासांत बरसलेला पाऊस मिलीमीटरमध्ये
घाटघर 155, रतनवाडी 146, पांजरे 145, वाकी 75, भंडारदरा 85, निळवंडे 19, आढळा 02, कोतूळ 02.
*धरण पाणीसाठा दलघफूटमध्ये
भंडारदरा 10,667 (96.63 टक्के), निळवंडे 7,067 (84094 टक्के), मुळा 21,602 (83.08 टक्के), आढळा 986 (93.02 टक्के), भोजापूर 361 (100 टक्के).