कोपरगावमध्ये आठवडे बाजारात नागरिकांचे लसीकरण रस्ते मोकळे झाल्याने वारंवार होणारी वाहतूक कोंडीही टळली

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अनेक वर्षांपासून शहरभरात बेशिस्तपणे भरणारा आठवडे बाजार सोमवारी (ता.20) पालिका प्रशासनाने बाजारतळावर भरविला. त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलीस अधिकार्‍यांनी बाजारातील विक्रेते व ग्राहकांत कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना जागेवर लस देण्यात आली.

मागील दोन वर्षांपासून तालुक्याच्या आठवडे बाजाराची वाताहत सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी भाजीबाजार भरवला जात असे. त्यातून रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊन चक्का जाम नित्याचा झाला होता. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून गेल्या आठवड्यापासून विक्रेत्यांना बाजारतळावर बसण्याचे आवाहन करण्यात येत होते. सोमवारी सकाळी पालिकेतील आरोग्य विभागप्रमुख सुनील आरणे कर्मचार्‍यांसह बाजारतळावर आले. त्यांनी व्यापारी धर्मशाळा, पांडे गल्ली, जिजामाता उद्यान, गोदावरी नदीकडे जाणार्‍या रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांना उठवून बाजारतळावर पाठविले. त्यामुळे रस्ते मोकळे झाले.


पुढील आठवड्यापासून (कै.) राघोजी भांगरे बाजारओटे येथे भाजी बाजार, तर कापड, रेडिमेड, किराणा, भेळ, स्टील भांडी, मसालेविक्रेते व मांस-मासेविक्रेत्यांना नियोजित जागेवर बसविण्यात येणार आहे. तसा आराखडा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जात आहे. दरम्यान, कोरोना लसीकरण 100 टक्के पूर्ण व्हावे, यासाठी तहसीलदार विजय बोरुडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, पोलीस विभाग आदिंनी बाजारात प्रवेश करीत, लस न घेतलेल्यांचे प्रबोधन केले. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी त्यांचे जागीच लसीकरण केले. दरम्यान, बेशिस्तपणे कुठेही बसून विक्रेत्यांनी अमरधामकडे जाणारा रस्ता बंद केला होता. तो आज मोकळा करण्यात आला. सराफ बाजार ते अमरधाम हा रस्ता मोकळा झाला. रस्ते मोकळे झाल्याने वारंवार होणारी वाहतूक कोंडी टळली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


शहरातील विविध रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. विक्रेत्यांनी ही अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येईल.
– सुनील आरणे (आरोग्याधिकारी, नगरपालिका)

Visits: 4 Today: 1 Total: 30433

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *