विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा पतीने इतर दोघींशी लग्न केले असल्याचेही तक्रारीत नमूद

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील निंभेरे येथे एका विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी शारीरिक, मानसिक छळ करून घरातून हाकलून दिले. पतीने इतर दोन तरुणींशी लग्नगाठ बांधून फसवणूक केली. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय ऊर्फ गणेश विठ्ठल नागरे, सखूबाई विठ्ठल नागरे, विठ्ठल कारभारी नागरे, सोनल गणेश शेळके, गणेश विठ्ठल शेळके, गणेश भाऊसाहेब सांगळे (सर्व रा.निंभेरे) अशी आरोपींची नावे आहेत. सविता विजय नागरे (वय 24, रा.निंभेरे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की सन 2013 मध्ये विजय नागरे याच्याशी विवाह झाला. सुरवातीचे काही दिवस व्यवस्थित नांदविले. अडीच वर्षांची एक मुलगी आहे. सन 2015 मध्ये पती, सासू, सासरे यांनी गायी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यास सांगितले.

त्याप्रमाणे पैसे आणून दिले. काही दिवसांनी पुन्हा गाडी घ्यायला एक लाख रुपये माहेराहून आणायला सांगितले तेही दिले. पुन्हा घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून शारीरीक व मानसिक छळ केला आणि घरातून हाकलून दिले. दरम्यान, पती विजय याने अलका तांदळे (रा.शेवगाव), त्यानंतर अक्षदा घुगे (रा.संगमनेर) या दोन तरुणींशी लग्न केले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
