राष्ट्रपुरुष, सैनिक व शेतकर्यांच्या त्यागाची जाणीव असावी ः नवले ‘अभिनव’च्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त वीर जवानांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, अकोले
विश्वरत्न तथा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी राज्यघटना जन्माला आली. संविधानाच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येऊ लागला असल्याने हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. यादिनी राष्ट्रपुरुष सैनिक व शेतकर्यांच्या त्यागाची जाणीव असावी, असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अभिनव संकुलात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अभिनवच्या अविनाश मुठे व यश नाईकवाडी या दोन विद्यार्थ्यांनी चित्तथरारक घोडेस्वारी करत तिरंग्याला सलाम केला. विशेष म्हणजे भारतमातेची सेवा करणार्या अकोले तालुक्यातील वीर जवानांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जम्मू-काश्मिरला तैनात असलेले सुजित बाळसराफ, श्रीनगर येथे तैनात असलेले दत्तू मंडलिक, सुदर्शन लांडे, लेह-लडाख सीमेवर तैनात असलेले विश्वास कर्णिक, सूरज भुजबळ, अहमदाबाद येथे तैनात असलेले किरण भुजबळ यांचा समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत वीर जवानांच्या मुलांना अभिनव शिक्षण संस्थेच्या स्कूलमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली.
या कार्याक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी, मंदा नवले, विश्वस्त विक्रम नवले, माजी प्राचार्य शिवाजी चौधरी, डॉ.जयश्री देशमुख, सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत मंडलिक यांनी करुन आभार मानले.