कोपरगावमध्ये सावकारीतून जमीन नावावर करण्यासाठी मुजोरी आठ जणांवर गुन्हा; अकरा लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील आणखी पैशांची मागणी केली. त्यानंतर पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर करण्यासाठी संगनमत करुन अपहरण व मारहाण करुन डांबून ठेवल्याचा प्रकार कोपरगाव तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ ११ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक केली आहे.

याबाबत तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी शुक्लेश्वर उत्तम भुजाडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद आनंदराव गायकवाड, दत्तू आनंदराव गायकवाड, सुनील भुजबळ, नारायण जाधव, प्रतीक उर्फ खंडू शरद गायकवाड, चेतन प्रभाकर मोरे, शैलेश राजेंद्र वाघ व आणखी एक अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी शरद गायकवाड, खंडू गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सदर गुन्ह्यातील दोन आरोपी शैलेश वाघ व चेतन मोरे यांची नावे सांगून गुन्ह्यात वापरलेली गाडी ही चेतन मोरे याची असल्याचे समोर आल्याने मोरे यालाही अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह तिघांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने केली आहे.

Visits: 190 Today: 1 Total: 1986479

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *