नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंड लावण्यासारखीच परिस्थिती ः टोपे

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंड लावण्यासारखीच परिस्थिती ः टोपे
संपूर्ण लॉकडाऊन करणे आता संपले; जनतेने सहकार्य करण्याची अपेक्षा
नायक वृत्तसेवा, नगर
‘कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काहीच नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना शिक्षित करणे व सुरक्षित अंतर, मास्क वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नसतील, सुरक्षित अंतर पाळत नसतील, त्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.


अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा आज दहा लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाची संख्या ही दहा लाखांच्या पुढे गेली असली तरी त्यामध्ये साडेसात लाख हे लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दहा लाखांचा आकडा हा लक्षात ठेवण्यापेक्षा सक्रीय रुग्ण किती आहेत, हे लक्षात घ्यावे. या रुग्णांमधील गंभीर हे तीन ते चार टक्के असतात. परंतु संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काही नाही. यासाठी प्रबोधन करून लोकांना चांगले शिक्षित करणे व सुरक्षित अंतर, मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच महाराष्ट्रभरात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍यांना, सुरक्षित अंतराचा नियम न पाळणार्‍यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण जोपर्यंत लस निर्माण होत नाही, तोपर्यंत कोरोनासोबत जगायचे आहे. त्या दृष्टीकोनातून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.


आज ज्या रुग्णांना बेड पाहिजे, ऑक्सिजन हवा आहे, आयसीयू हवा आहे, त्यांना तो मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे, यावर आमचा भर आहे, असे सांगून टोपे पुढे म्हणाले, मृत्यूदर कमी झाला पाहिजे यासाठी ज्या उपचाराच्या अनुषंगाने उत्कृष्ट उपाययोजना करता येतील, त्या आम्ही करत आहोत. जनतेने देखील सर्व कामात चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

कोरोनामुळे काही शहरांमध्ये, तालुक्यांत जनता संचारबंदी पुकारली जात आहे. एखाद्या जिल्ह्यातील बेडची क्षमता संपत आली व ही क्षमता वाढवायची असेल, तर अशावेळी जनता संचारबंदी करण्याचा फायदा होतो. यामुळे लोक घरात थांबल्याने संक्रमण थांबते, दुसरा फायदा म्हणजे बंदच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कालावधी मिळतो. त्यामुळे जेथे-जेथे स्थानिक प्रशासन, तेथील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना वाटत असेल, त्याठिकाणी ते छोट्या कालावधीचा जनता संचारबंदी करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर विचार करतात. परंतु संपूर्ण लॉकडाऊन करणे हा आता विषय राहिला नाही. आपण आता अनलॉक करण्याचे कामच टप्प्याटप्याने करीत आहोत.
– राजेश टोपे (आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य)

Visits: 11 Today: 1 Total: 115062

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *