फिल्मसृष्टीत कोपरगावच्या अर्जुन भायभंग संगीत दिग्दर्शकाचा उदय

फिल्मसृष्टीत कोपरगावच्या अर्जुन भायभंग संगीत दिग्दर्शकाचा उदय
सूर्यतेज संस्थेकडून गौरव; विविध चित्रपटांचे केले आहे संगीत दिग्दर्शन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील सप्तर्षीमळा येथील अर्जुन भायभंग या तरुणाने अल्पावधीत संगीत दिग्दर्शनात भरारी घेतली आहे. संगीताची बालवयात आवड जोपासलेल्या अर्जुनचे शालेय शिक्षण हे सेवानिकेतन स्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण एस. एस. जी. एम. महाविद्यालय येथे झाले आहे. शालेय शिक्षण घेत असताना संगीताची आवड म्हणून अर्जुन आनंद (अण्णा) आढाव यांचेकडे हार्मोनियम शिकत असे. पुढे एमईटीच्या भुजबळ नॉलेज सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग पदवी संपादन केल्यानंतर अर्जुनने मुंबई येथे साऊंड इंजिनिअरिंगचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यानंतर त्याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन करुन वेगळा ठसा उमटविला आहे. याच कामगिरीचे कौतुक करुन नुकताच त्याचा कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था आणि कोपरगावकरांच्यावतीने गौरव करण्यात आला आहे.


दरम्यान, शिक्षण घेत असतानाच त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरुणाईला आवडता असणारा ‘सिफर रॉक बँड’ पथकात सहभाग घेतला. या बँडने आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रम नोंदविलेले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील सन्मानही मिळवले आहे. देश-विदेशातील अनेक रसिकांना या बँडने मोहिनी घातली असून अनेकांची मने जिंकली आहेत. यानंतर अर्जुनने बॉलिवूडकडे लक्ष केंद्रीत केले. झी कंपनीसोबत त्याची पहिली सुरुवात झाली. अशरफी ही पहिली डान्स म्युझिक रेकॉर्ड प्रसिद्ध झाली आहे. डान्स व संगीतावर प्रेम करणार्‍या भारतीयांनी अशरफी अक्षरशः डोक्यावर घेतली. या रेकॉर्डमधील काही गाणी देशातील डीजे साऊंडमध्ये वाजू लागली यातच सारे काही आले आहे.


स्वतःच्या इच्छाशक्ती बळावर अर्जुनने ड्रमर, गिटार, पियानो, बेस या वाद्य वादनाचे ज्ञान आत्मसात केले आहे. मुंबईतील बीट फॅक्टरी इन्स्टिट्यूटमधून संगीताची आवड असणार्‍यांना तसे शिक्षण देण्यास सुरुवात केली. या माध्यमातून अर्जुनने हजारो विद्यार्थ्यांना संगीताचे व्यावसायिक शिक्षण दिले असून आजही तो देत आहे. सध्या तो बीट फॅक्टरी अकॅडेमी संस्थेचा प्रमुख आहे. संगीताविषयी विशेष रुची असणार्‍यांसाठी अर्जुनने मोफत कार्यशाळाही घेतल्या आहेत.


अर्जुनने संगीत दिग्दर्शन केलेला हिंदी चित्रपट ‘हलाहल’ 21 सप्टेंबर, 2020 रोजी प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करताना अर्जुनने इतरही मोठ्या प्रोजेक्टला संगीत देण्याचे काम सुरु ठेवले आहे. झी म्युझिक कंपनीसारख्या दिग्गज संस्थेसोबत काम करताना अर्जुनने ‘झी’साठी ‘अशरफी’ नावाने डान्स म्युझिक रेकॉर्डस तयार केले. तसेच त्याने संगीतबद्ध धारावाहिकमध्ये तरुणांसोबत रसिक प्रेक्षकांना आवडलेल्या कॉलेज रोमान्स (नेटफ्लिक्स), भूतपूर्व, ब्रोचारा अशा अनेक सिरीयल्सला अर्जुनने आपल्या जादुई संगीताने प्रसिध्दीच्या लाटेवर आणले आहे. सिरीजमधील त्याची गाणी लाखो प्रेक्षकांपर्यंत यू-ट्युब, स्पॉटिफी, गाना, सावन अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली आहेत. त्याचबरोबर अर्जुनने अनेक नामांकित कंपनीच्या जाहिरातीला संगीत दिले आहे.


अर्जुन पाटबंधारे अभियंता व ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे माजी अध्यक्ष स्व. सी. आर. भायभंग तथा दादांचा नातू आहे. तसेच अर्जुनचे वडील सुरेंद्र भायभंग कृषी तंत्रज्ञ असून भायभंग कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत. तर आई राधिका ह्या एम. ए. मराठी पदवीधर असून गृहिणी आहेत. त्याचा नुकताच शाल व सन्मान चिन्ह देवून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, समर्थ भुसारे यांनी गौरव केला आहे. याप्रसंगी अर्जुनचे वडील (सुरेंद्र), आई (राधिका), डी. एन. मार्टचे संचालक नितीन भुसारे उपस्थित होते. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही अर्जुनला बोलावून घेत त्याचे कौतुक केले आहे. भायभंग कुटुंबाबरोबर कोपरगावचे नाव संगीत दिग्दर्शनात उत्तुंग नेणार्‍या तरुण संगीत दिग्दर्शक अर्जुन भायभंगचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 118178

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *