खासदारांच्या निधीतून ‘अखेर’ जिल्ह्याला मिळाल्या बारा रुग्णवाहिका! प्रशासकीय अनास्थेमुळे रखडलेल्या विषयाला दैनिक नायकच्या वृत्ताने मिळाली होती हवा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील कोविड प्रादुभार्वाच्या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी दिलेल्या निधीबाबतचे सविस्तर वृत्त गेल्या गुरुवारी (ता.21) दैनिक नायकने प्रसिद्ध केले होते. अर्थात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी शासकीय निधीची प्रतिक्षा न करता आपापल्या मतदारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई केल्याची माहितीही अवघ्या जिल्ह्याला आहे. त्याचवेळी आपत्कालीन स्थितीत जाहीर झालेल्या निधीचा पाठपुरावा करण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याने लोकप्रतिनिधींनी निधी देवूनही त्याचा वापर झाला नसल्याचे वास्तव दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी समोर आणले आहे. जिल्ह्यातील सर्वाधीक कोविड निधी देणारे खासदार ठरलेल्या डॉ.विखे यांनी सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील बारा तालुक्यांसाठी रुग्णवाहिका खरेदी केल्या, प्रजासत्ताक दिनी त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

गेल्यावर्षी मार्चपासून राज्यात दाखल झालेल्या कोविडचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक आमदारांला आपापल्या मतदार संघासाठी प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी दिला होता. त्यातील किमान 20 लाख रुपये केवळ कोविडसाठी खर्च करण्याचे बंधन होते.
या काळात अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांच्यासह आठ आमदारांनी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा निधी मिळवला. मात्र यातील काही आमदारांनी मिळालेल्या निधीचा वापरच केला नसल्याचे अथवा संपूर्ण निधी न वापरल्याचे वास्तव माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी मिळविलेल्या माहितीतून समोर आले होते. कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येत असतांनाही खासदार डॉ.विखे यांनी दिलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांचा वापर झाला नसल्याचे या माहितीतून समोर आले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त गेल्या गुरुवारी (21 जानेवारी) दैनिक नायकमध्ये प्रसिद्ध होताच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्येच खळबळ उडाली होती.

या वृत्ताची तत्काळ दखल घेत नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना फैलावर घेतले. निधी जाहीर झालेला असतांना व तो कशासाठी खर्च करायचा आहे हे देखील निश्चित असतांना पुढील कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल करीत त्यांनी घोषीत झालेल्या रुग्णवाहिका ताबडतोब खरेदी करण्याच्याही सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यानुसार अवघ्या पाच दिवसांत प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे रखडलेली प्रक्रीया राबविली गेली आणि मंगळवारी (26 जानेवारी) खासदार विखे यांनी जाहीर केलेल्या एक डझन रुग्णवाहिका नगरमध्ये दाखल झाल्या. यावेळी बोलतांना खासदार डॉ.विखे पाटील यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राऊंडवरील मुख्य कार्यक्रम संपताच दाखल झालेल्या या बाराही रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा नेते शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, प्रा.भानुदास बेरड, भैय्या गंधे, अभय आगरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, डॉ.संदीप सांगळे, डॉ.बापूसाहेब गाढे, सुजीत झावरे, बाबासाहेब वाकळे, सुरेंद्र गांधी, अभय आव्हाड, मोहनराव पालवे दिलीप भालसिंग, श्याम पिंपळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, अनुजा गायकवाड, विजय कापरे, अमोल मैड, सुभाष दुधाडे, गणेश जायभाय आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व विखे समर्थक उपस्थित होते.

माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून शिर्डी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोविड काळात 46 लाख 56 हजारांचा निधी मिळाला होता, त्यातील केवळ 3 लाख 49 हजार रुपयांचा निधी त्यांनी खर्च केल्याचे समोर आले होते. मात्र या आकडेवारीला विखे पाटील यांच्या यंत्रणेने विरोध केला असून सदरची माहिती अर्धवट व चुकीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कालावधीत आमदार विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघातील आरोग्य सुविधांसाठी मिळालेल्या निधीतून 19 लाख 97 हजार रुपये खर्च केल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

21 जानेवारीचे वृत्त केवळ लोकप्रतिनिधींना मिळालेल्या निधीबाबत प्रकाश टाकणारे होते. प्रत्यक्षात संगमनेर, शिर्डी, नेवासा व राहुरी येथील लोकप्रतिनिधींनी शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचे संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. या नेत्यांच्या सहकारी संस्थांकडून त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांना संसाधनांच्या उपलब्धतेसह आपापल्या कार्यक्षेत्रातील सहकारी कारखान्यांकडून कोविड केअर सेंटर्सची उभारणीही केली होती. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तर शंभर खाटांचे कोविड रुग्णालय उभे करण्यासह स्राव चाचणीचीही व्यवस्था करण्यात आली होती.

नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या 1 कोटी 99 लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात बारा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील बारा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या कार्यरत राहतील असे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी निवडलेल्या सामाजिक संस्थांचा पूर्वइतिहासही त्यासाठी अभ्यासला गेला आहे. या रुग्णाहिकांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत होईल अशा प्रतिक्रीया प्रजासत्ताक दिनी झालेल्या लोकार्पण सोहळ्यातून समोर आल्या.

