बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे सहव्वीस प्रवासी बचावले
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथील मुळानदीच्या उड्डाणपुलावर राज्य परिवहन विभागाच्या बसला गुरुवारी (ता.21) दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीट होऊन खालील बाजूने आग लागली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या बाजूला घेतली. त्यानंतर आजूबाजूच्या तरूणांनी धाव घेऊन माती व पाणी टाकून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळून 26 प्रवाशी बालंबाल बचावले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मिरज आगाराची बस (क्रमांक एमएच.14, बीटी.4899) ही चालक अमोल ज्ञानेश्वर नांदूरकर व वाहक हे 26 प्रवाशांना नाशिक येथून संगमनेर मार्गे सांगली (मिरज)ला जात होते. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही बस घारगाव येथील मुळानदीच्या उड्डाणपुलावर आली असता त्याच दरम्यान काही दुचाकीस्वारांनी बसला खालच्या बाजूने आग लागली असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ बसचालकाच्या ही बाब लक्षात आणून दिली. चालकाने प्रसंगावधान राखत ही बस सुरक्षितरित्या महामार्गाच्या बाजूला उभी करत प्रवाशांना खाली उतरवले. तोपर्यंत घटनास्थळी हजर झालेले नवनाथ गाडेकर, सोमनाथ गांडाळ, महेश घाटकर, अमीर शेख या तरूणांनी माती व पाणी टाकून ही आग विझवली. यामध्ये चालक नांदूरकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. बसच्या पुढील खालच्या बाजूस शॉर्टसर्कीट होवून ही लाग लागली होती. दरम्यान, तरूण व बसचालकाच्या सतर्कतेमुळे सव्वीस प्रवाशी बालंबाल बचावले आहेत.