पर्यटकाला जलसमाधी मिळाल्याने कोतूळ पुलाचे काम ऐरणीवर! जलसंपदा विभाग व कोतूळकरांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष..

नरेंद्र देशमुख, अकोले
तालुक्याच्या मुळा खोर्यातील प्रमुख बाजारपेठेचे केंद्र म्हणून कोतूळची ओळख आहे. परंतु, परिसरातील गावांना कोतूळला येण्यासाठी मोठा विळखा मारुन यावे लागते. कारण, पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पूल गेल्याने रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, प्रस्तावित नवीन पुलाच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघूनही साधी वीटही रचलेली नाही. अशा परिस्थितीत शनिवारी पहाटे तीन पर्यटकांपैकी एकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेने ‘पुन्हा’ एकदा कोतूळ पुलाचा विषय ऐरणीवर आला आहे. आता कोतूळकर आणि परिसरातील गावे कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

शनिवारी पुण्याहून कळसूबाईला जाणारे पर्यटक गुरूसत्य राजेश्वर राक्षेकर (वय 42) व समीर सुधीर आलुरकर (वय 44) हे दोघे कारचालक सतीश सुरेश घुले (वय 34) याच्याबरोबर कारमधून (क्र.एमएच.14, केवाय.4079) जात होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास कोतूळमध्ये आले असता गुगल मॅपवर रस्ता शोधला. त्यानंतर कोतूळ ते राजूर ऐवजी कोतूळ ते अकोले रस्ता दाखविला. कोतूळ पुलानजीक आले असता कारचालकाला पुलावर पाणी दिसले. पावसाचे पाणी पुलावर आले असेल असे वाटल्याने त्याने पुलावरून गाडी घातली. थोडे अंतर पुढे गेल्यावर पाणी वाढल्याने राक्षेकर व आलुरकर दोघे पोहून बाहेर आले. परंतु कारचालक घुले यास पोहता येत नसल्याने तो कारसह बुडाला. या दुर्दैवी घटनेने तालुक्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.

दरम्यान, सन 2015 पासून कोतूळच्या युवकांनी पूल कृती समिती स्थापन करून मंत्रालयाचे उंबरठे झिजविले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सरकारने 2019 मध्ये 20 कोटी मंजूर केले. परंतु 2020 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असताना काम सुरू झालेच नाही. त्यामुळे कोतूळकरांनी 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी, 2020 असे चौदा दिवस बैठा सत्याग्रहा केला. जलसंपदाचे अधिकारी चर्चेसाठी आले असता त्यांना दोन तास कोंडून ठेवले. अखेर आमदार डॉ.किरण लहामटे, विनय सावंत व डॉ.अजित नवले यांनी मध्यस्थी करत 15 दिवसांत काम चालू करण्याचे आश्वासन दिले. पण त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने काम पुन्हा बारगळले.

प्रस्तावित कामामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव मेरी व मुख्य अभियंता जलसंपदा उत्तर विभाग यांच्याकडे आहे. त्यानंतर कार्यारंभ आदेश निघतील असे सांगितले जाते. नवीन बदलानुसार लांबी 262 मीटरऐवजी 255 मीटर ठेवण्यात आली असून 42.5 मीटरचे 6 गाळ्याऐवजी 26 मीटरचे 10 गाळे ठेवण्यात येणार आहेत. तसेच रूंदी पूर्वीप्रमाणेच 9 मीटर असून त्यात ट्रॅफिक ट्रॅकसह पादचारी पट्ट्या ठेवण्यात येणार आहेत. आता एका पर्यटकाच्या मृत्यूने जलसंपदा विभाग व मेरी यांच्याकडून तातडीने अंतिम मंजुरी मिळून कंत्राटदार पुलाचे काम चालू करतो की कोतूळकर नवीन पुलासाठी अभिनव आंदोलन करून सरकारला कार्यारंभ करण्यासाठी राजी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

