केळेवाडीत धाडसी घरफोडी; 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लांबविला परिसरात पसरले प्रचंड भीतीचे वातावरण; घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील केळेवाडी येथील सोनबा बाळाजी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. ही घटना सोमवारी (ता.19) भरदुपारी घडली आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथील सोनबा जाधव यांच्या बंद घराचे भरदुपारी कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाट उघडून त्यातील रोख रक्कम पाच हजार रुपये, दीड लाख रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र, पन्नास हजार रुपयांच्या लहान मुलांच्या कानातील बाळ्या, गळ्यातील ओमपान, अंगठी, पंचवीस हजार रुपयांचे चांदीचे कमरेचे छल्ले असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन चोरट्यांनी पोबारा केला आहे.

याप्रकरणी सोनबा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 436/ 2022 भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बोटा परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारीही चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आधीच वैतागलेले आहेत. त्यातच आता दिवसाढवळ्या चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Visits: 329 Today: 1 Total: 2126755

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *