संगमनेर तालुक्याने ओलांडले रुग्णसंख्येचे 23 वे शतक! शहरातील तेरा जणांसह आजही पडली चौतीस रुग्णांची भर
नायक वृत्तसेवा संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरुच असून आजही तालुक्याच्या रूग्णसंख्येत तब्बल 34 रुग्णांची भर पडली आहे. आज शासकीय प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून प्रत्येकी दहा आणि खासगी प्रयोगशाळेच्या चौदा अहवालातून शहरातील 13 जणांसह ग्रामीण भागातील 21 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. आजही रूग्णसंख्येत पुन्हा एकदा भर पडल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा 23 वे शतक ओलांडून 2 हजार 305 वर पोहोचला आहे.
शुक्रवारी संगमनेर तालुक्यात 25 रुग्ण समोर आले होते. त्यात शहरातील केवळ सात तर ग्रामीण भागातील 18 रुग्ण आढळून आले होते. मध्यरात्रीच्या वेळेला खासगी प्रयोगशाळेच्या एका अहवालातून तालुक्यातील रुग्ण संख्येत आणखी पाचची भर पडून शुक्रवारी बाधित झालेल्यांची संख्या तीसवर पोहोचली. त्यामुळे कालच तालुक्याच्या बाधितांनी 23 व्या शतकाच्या दिशेने आगेकूच केली होती. आज 34 रुग्णांची भर पडून ती पूर्णही झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील पद्मानगर परिसरातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, भरीतकर मळा परिसरातील 58 व 45 वर्षीय इसम, मालदाड रोड परिसरातील 70 वर्षीय महिलेसह 34 वर्षीय तरुण, गणेश नगर परिसरातील तीस वर्षीय महिला, सावतामाळी नगर मधील 55 वर्षीय इसम, गिरीराज विहार कॉलनीतील 32 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय बालक, रहेमत नगर परिसरातील 45 वर्षीय तरुण व विद्यानगर परिसरातील 68 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 52 वर्षीय महिला संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.
तर तालुक्यातील 21 जणांमध्ये घुलेवाडी येथील 61 वर्षीय इसम व 17 वर्षीय दोघांसह पंधरा वर्षीय तरुण, आश्वी खुर्द मधील 55 वर्षीय महिला, चिकणी येथील 65 वर्षीय महिला, साकुर येथील 42 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 16 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक मधील 28 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 68 व चाळीस वर्षीय महिलांसह 25 व 21 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 50 वर्षीय महिला,
देवकवठे येथील 65 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 50 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 62 व 55 वर्षीय इसम, जोर्वे येथील 41 वर्षीय तरुणासह ओझर खुर्द मधील 55 वर्षीय महिला अशा एकूण 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची रुग्णसंख्या तेविसावे शतक पूर्ण करून 2 हजार 305 वर पोहोचली आहे.
संगमनेर तालुक्याची रुग्ण संख्या वाढण्यासोबतच तालुक्यातील कोविड बळींची संख्याही या महिन्यात वाढली आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये शहरासह तालुक्यातील नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल रात्रीही तालुक्यातील हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसमाचा कोविडच्या विषाणूंशी सुरू असलेला संघर्ष थोटा पडल्याचे वृत्त समजले. त्यांच्यावर गेल्या पाच सप्टेंबर पासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या इसमाच्या मृत्यू मुळे तालुक्यातील कोविड बळींमध्ये आणखी एकाची भर पडून अधिकृतपणे मृतांची संख्या 31 तर दैनिक नायकच्या विश्वसनीय सूत्रांनुसार 35 वर पोहोचली आहे.