घरावरील पत्रे तोडून बिबट्या थेट घरात; मुरशेत येथील थरारक घटना! झाडावरील कोंबड्यांची शिकार घेऊन जात असताना चुकला अंदाज

नायक वृत्तसेवा, अकोले
सरत्या वर्षाला जड अंतःकरणाने निरोप देऊन सर्वजण निवांत झोपले होते. नववर्ष खूप सारी सुखसमृद्धी घेऊन या भाबड्या आशेवर असतानाच नेमकं घडलं भलतेच. घरावरील पत्रे तोडून साक्षात मृत्यूच त्यांच्या अंगावर कोसळला. अंगावरील पांघरुन काढून पाहतात तर काय समोर बिबट्या. अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील मुरशेत येथे हा थरार घडला.

मुरशेत येथील दुंदा गोलवड यांच्या घराशेजारील झाडावर रात्रीच्या वेळी कोंबड्या बसतात. भक्ष्याच्या शोधात बिबट्या अंधारात झाडावर चढला. दोन कोंबड्या जबड्यात पकडून त्याने झाडावरुन उडी मारली. मात्र त्याचा अंदाज चुकला नि बिबट्या घराच्या पत्र्यावर पडला. पत्रा तुटून तो थेट आत कोसळला. आतमध्ये दुंदा गोलवड, त्यांची पत्नी जनाबाई, सून द्वारका, मुलगी साक्षी, समीर, विराज हे झोपलेले होते. आवाजाने सगळे जागे झाले. पाहतात तर, अंगावर बिबट्या बसलेला. कडाक्याच्या थंडीतही सगळे घामाने डबडबले. जनाबाई पलंगाखाली सरकल्या. द्वारका व साक्षी जीव मुठीत घेऊन बिबट्याकडे पाहत एकमेकींना धीर देत होत्या. समोर मृत्यू दिसत होता. घराचे दरवाजे बंद होते. ते उघडून बाहेर काढायचेही कोणात धाडस नव्हते.

कारण बिबट्या त्यांच्यासमोर होता. सर्वच निपचित पडून होते. सर्वच देवाचा धावा करीत होते. बिबट्याही घाबरलेल्या अवस्थेत होता. तो सर्वांच्या अंगावरून चालत गेला नि चुलीवर चढून खिडकीत उडी घेतली. तेथून कौले तोडून त्याने पुन्हा घरावर उडी घेतली नि बाहेर पडला. बिबट्या बाहेर पडताच सगळ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. घरासमोरील पडवीत दुंदा गोलवड झोपले होते. कौलांचा आवाज झाल्याने ते बाहेर पडले, तर समोर बिबट्या. त्यांचीही बोबडी वळली. मात्र, महिलांच्या आवाजाने शेजारी धावले. कुत्रे भुंकू लागले. बिबट्या आल्या पावली परतला. बिबट्याच्या भीतीने गावाचीच झोप उडाली. आता रोज रात्री जागता पहारा देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान, दुसरी घटना तालुक्यातील समशेरपूर येथे घडली आहे. येथील मच्छिंद्र रामनाथ भरीतकर यांच्या घरासमोर बांधलेल्या गायीस दोन बिबट्यांनी एकत्र फडशा पाडला. रात्रीच्या अंधारात हे बिबटे मंडलिक यांच्या शेताशेजरील घरासमोर आले नि त्यांच्या गायीच्या नरडीचा घोट घेतला. भरीतकर सकाळी गाईचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना हा थरार दिसला. वन विभागाचे वनक्षेत्रपाल जयराम गोंदके यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असता दोन बिबटे असल्याचे त्यांनी सांगितले.

Visits: 55 Today: 1 Total: 435541

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *