देवळाली प्रवरा येथील गावठी दारूचे अड्डे उध्वस्त! पोलीस व राज्य उत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई..

नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला आहे. सदर कारवाई शुक्रवारी (ता.9) केली असून, 1 लाख 82 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील 6240 लिटर कच्चे रसायन, तयार 118 लिटर गावठी हातभट्टी दारू व 200 किलो नवसागर असा एकूण 1 लाख 82 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन शिरसाठ यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन आशाबाई बाळासाहेब गायकवाड, मयूर अनिल गायकवाड, सतीश वसंत गायकवाड, बापू भास्कर गायकवाड, मंगल बापू गायकवाड व एक अज्ञात (फरार) यांच्याविरुध्द भादंवि कलम 328, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (फ) नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर भागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपाधीक्षक नीतेश शेंडे, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ आदिंनी केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे.

Visits: 200 Today: 1 Total: 1907196

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *