शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व मोफत कोविड सेंटर बंद! रुग्णसंख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय; आरोग्य सेवा पूर्वपदावर येणार
नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व तालुका ग्रामीण रुग्णालयांत शासनातर्फे सुरू करण्यात आलेले मोफत डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरची रुग्णसेवा शुक्रवारपासून (ता.1) बंद झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाने सर्व सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळातील कंत्राटी कर्मचार्यांनाही कार्यमुक्त करण्यात आले. यापुढे गरजू कोरोना रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा यांनी दिले आहेत.
कोरोना काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासनातर्फे कोरोना रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, सात दिवस विलिनीकरण, मोफत औषधोपचार, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी व रक्त तपासण्या, छातीचा एक्स-रे, गरजूंना ऑक्सिजन सुविधा, चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्चुन मिळणारी वैद्यकीय सेवा शासनाच्या हेल्थ सेंटरमध्ये मोफत मिळू लागली. मागील सात-आठ महिने गोरगरीब रुग्णांसाठी शासनाचे कोविड हेल्थ सेंटर देवदूत ठरले.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद केले. आता नवीन वर्षात जिल्ह्यातील सर्व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांत विस्कळित झालेली इतर आरोग्य सेवा आता पूर्वपदावर येणार आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, बाळंतपण, माता-बाल संगोपन सेवा, बाह्यरुग्ण व इतर आंतररुग्ण सेवा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.
राहुरी तालुक्यात जून 2020 पासून कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. राहुरी फॅक्टरी येथे उभारलेल्या डेडीकेटेड हेल्थ सेंटरमध्ये 163 रुग्ण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले. कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने शुक्रवारपासून कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आले आहेत.
– डॉ.नलिनी विखे (तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी)
बंद झालेले कोविड सेंटर…
श्री विवेकानंद नर्सिंग होम राहुरी फॅक्टरी (राहुरी), साईबाबा रुग्णालय शिर्डी (राहाता), डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह शेवगाव, सी.आर.एच.पी. जामखेड, शासकीय कोविड हेल्थ केअर सेंटर अकोले, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, ग्रामीण रुग्णालय कोपरगाव.