संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण वाढलेलेच! आजही शहरातील पंधरा जणांसह एकूण पंचेचाळीस जणांना झाली लागण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरू झालेले कोविडचे संक्रमण आजही कायम आहे. दररोज समोर येणार्‍या मोठ्या रुग्णसंख्येमुळे संगमनेर शहरातील सर्व कोविड रुग्णालये फुल्ल झाली असून कोविड केअर सेंटर्समध्येही मोठी गर्दी दाटली आहे. असे असतानाही नागरिकांकडून अद्यापही कोविडचे तंतोतंत पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. आजही ससंगमनेर तालुक्यात तब्बल 45 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून शहरापेक्षा ग्रामीणभागातील संक्रमणात दुप्पट वाढ झाल्याचे दिसत असून नागरिक अद्यापही मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावीत असल्याचे त्यातून दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येच्या फुगवट्यात आजही वाढ झाल्याने तालुका आता 7 हजार 266 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. त्यातील केवळ 267 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील संक्रमणात मोठी होत असल्याचे दिसून येत आहे. अचानक सुरू झालेल्या या संक्रमणामागे तालुक्यात झालेले काही लग्न सोहळे असल्याचेही यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र असे असताना आजही काही ठिकाणी नियम आणि कोविडची भीती दूर सारीत काही ‘मनमौजी’ समाजाचे स्वास्थ बिघडवण्यासाठी अशा सोहळ्यांचे आयोजन करीतच असल्याचे गेल्या दोन दिवसांत शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून दिसून येत आहे. मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांना उपस्थित रहाण्याचेच टाळणे आवश्यक असताना काहीजण नातेसंबंधात अडसर नको म्हणून आपले व आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालीत असल्याचेही या गदारोळात दिसत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येत आजचा दिवसही नोंदविला गेला असून आज सकाळीच प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील पंधरा जणांसह तालुक्यातील 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील विद्यानगरमधील 44 वर्षीय महिला, साईश्रद्धा चौकातील 27 वर्षीय महिला, गोविंदनगर मधील 35 वर्षीय तरुण, सह्याद्री महाविद्यालयामागील परिसरातील 17 वर्षीय तरुणी, साईदर्शन कॉलनीतील 15 वर्षीय मुलगी, मालदाड रोडवरील 75 व 50 वर्षीय महिलांसह 42 वर्षीय तरुण, श्रमिकनगरमधील 70 वर्षीय महिला, बाजारपेठेतील 82 वर्षीय महिला, गणेशनगरमधील 43 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, जनतानगरमधील 41 वर्षीय तरुण, कुंभार गल्लीतील 10 वर्षीय मुलगी, अरगडे गल्लीतील 64 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 50 वर्षीय इसम, निमज येथील 60 वर्षीय महिला व 49 वर्षीय इसम, निंबाळे येथील 52 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 45 वर्षीय इसम, समनापूर येथील 55 व 27 वर्षीय महिलांसह 31 वर्षीय तरुण,

कासारा दुमाला येथील 65 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडी येथील 48 वर्षीय इसमासह 40 व 21 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणी, राजापूर येथील 55 वर्षीय इसम, निमगाव जाळीतील 45 वर्षीय इसम, चिंचोली गुरव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंडेरायवाडीतील 55 वर्षीय महिलेसह 11 वर्षीय मुलगा, चणेगावमधील 70 वर्षीय ज्येष्ठासह 55 वर्षीय इसम, 50 वर्षीय महिला व आठ वर्षीय मुलगी, चिंचपूरमधील 45 वर्षीय इसम, लोहारे येथील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव कोंझिरा येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला, देवगावमधील 55 वर्षीय महिला व सायखिंडीतील 65 ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय इसम अशा एकूण 45 जणांना कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 266 झाली असून त्यातील 267 रुग्ण सक्रीय आहेत.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेल्या कोविडच्या संक्रमणाने संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत 7 हजार 266 जणांना त्याची लागण झाली असून त्यात शहरातील 2 हजार 141 तर ग्रामीणभागातील 5 हजार 125 रुग्णांचा समावेश आहे. आजवर तालुक्यातील 6 हजार 942 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून तालुक्यातील 57 रुग्णांचे आत्तापर्यंत बळी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचा तालुक्याचा सरासरी दर 95.77 टक्के असून आजच्या स्थितीत तालुक्यातील 267 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये व कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत.

Visits: 22 Today: 1 Total: 118196

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *