पुणे-नाशिक महामार्गाने घेतला आणखी एका निष्पापाचा बळी! अज्ञात वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी मृत्यूघंटा म्हणून कुपरिचित असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणानंतरही अपघातांची श्रृंखला खंडीत होण्याचे नाव घेत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. या साखळीत आज पहाटेच्या सुमारास आणखी एका अपघाताची नोंद झाली असून अज्ञात वाहनाने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कर्हेघाटात घडली. या अपघातात देवचंद आप्पासाहेब घुले या तरुणाचा बळी गेला. तो मालपाणी उद्योग समूहात सुरक्षा विभागात कार्यरत होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालदाड रोड परिसरात राहणारा देवचंद घुले याची सायखिंडी शिवारात शेतजमीन आहे. गुरुवारी रात्री तो आपल्या रानात गेलेला होता. तेथून आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तो माघारी निघाला होता. त्याची दुचाकी कर्हेघाटात आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन उडून पडल्याने त्याला गंभीर दुखापती झाल्या व त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र त्याला धडक देणारा वाहनचालक न थांबता निघून गेल्याने व अपघाताची वेळ पहाटेची असल्याने दरम्यानच्या कालावधीत महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू होती.

त्यामुळे जखमी अवस्थेत पडलेल्या या तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही. मात्र अपघातानंतर साधारणात: अर्धा तासात नाशिकहून पुण्याकडे जाणार्या एका वाहनचालकाची नजर जखमी अवस्थेत निपचित पडलेल्या त्या तरुणावर पडली आणि त्याने याबाबत 108 क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच आरोग्य विभागाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्याद्वारे जखमी तरुणाला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र अपघातानंतर बराचवेळ जखमी तरुण घटनास्थळीच पडून असल्याने त्याच्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

याबाबत तालुका पोलिसांना माहिती कळविल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरुन तो मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा विभागात सेवेत असल्याचे समोर आले. आज सकाळी पालिकेच्या शवविच्छेदनगृहात त्याच्या उत्तरीय तपासणीनंतर त्याचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर कळस येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित भाऊ व तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. देवचंद घुले यांच्या अपघाती निधनाबद्दल मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी शोक व्यक्त केला आहे.

जुन्या पुणे-नाशिक महामार्गाने सततच्या अपघातांमुळे मृत्यूघंटा म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. 2012 साली या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले. 2017 मध्ये अनेक ठिकाणची कामे अर्धवट असताना हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र नव्याने दुहेरी मार्गीका तयार होवूनही गेल्या पाच वर्षात हा महामार्ग आपली ‘मृत्यूघंटा’ ही ओळख पुसू शकलेला नाही. सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत या महामार्गावर अनेक अपघात झाले असून शेकडोंना आपला जीवही गमवावा लागला आहे. आज पहाटे झालेल्या अपघातात त्यात आणखी एका तरुणाच्या मृत्यूची नोंद झाल्याने नव्याने तयार झालेला महामार्गही मृत्यूघंटाच ठरल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

याबाबत मयत देवचंद घुले यांचे मेव्हणे सचिन वाकचौरे (रा.कळस) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) सह भा.दं.वि. कलम 279, 337, 338, 427, मोटरवाहन कायद्याचे कलम 134 (अ) (ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पारधी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

