माहुलीच्या तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने गाठला तळ! उन्हाळ्यापूर्वीच लाभधारक शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली येथील यावर्षी तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली येथील पाझर तलाव हा यंदाच्या पावसाळ्यात तुडूंब भरून वाहत होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण, या पाझर तलावातील पाण्याचा फायदा आजूबाजूला असलेल्या विहिरी, बोअरवेल यांना मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, आता तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने तळ गाठल्याने पाण्याचे उद्भवही आटू लागले आहेत. रब्बी हंगाम पूर्ण होण्याआधीच पाणी कमी पडू लागल्याने पिके जगवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. तर काही शेतकर्यांनी लगतच बोअरवेल घेतल्याने पाणी जिरत आहे. परंतु, यंदा तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. जर सबंधित विभागाने तलावाची चांगल्या पद्धतीने दुरूस्ती केली तर उन्हाळ्यातही तलावात पाणी शिल्लक राहील, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. आता संबंधित विभाग काय भूमिका घेतो याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.