नेवाशाच्या प्रभाग दोनमधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सर्वपक्षीय नगरसेवक व प्रभागातील महिलांनी वाढवले श्रीफळ
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील मध्यमेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (ता.31) युवा नेते संजय सुखधान व नगरसेविका शालिनी सुखधान यांच्या उपस्थितीत झाला. प्रभागातील महिलांसह नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संजय सुखधान म्हणाले, सदर होणार्या काँक्रिटीकरण रस्त्याचे काम हे दर्जेदार पद्धतीने होणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या सहकार्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली त्याबद्दल त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना धन्यवाद दिले. या रस्त्याची मंजुरी 2018-19 ची असून झालेल्या निवडणुका, कोरोनाचे संकट लागलेली आचारसंहिता या विविध कारणांनी ह्या रस्त्याचे काम थांबले होते. आता ‘लेट पण थेट’ परिपूर्ण काम होईल. पहिला व दुसरा अशा दोन टप्प्यांत रस्त्याचे काम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रस्त्याच्या शुभारंभाचा पहिला मान स्त्री शक्तीला देण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष सतीश पिंपळे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्रीफळ वाढवले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष पिंपळे म्हणाले, दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत ह्या रस्त्याचे काम होत आहे. हा निधी परत गेला होता; परंतु नगरसेविका शालिनी सुखधान यांनी केलेल्या पाठवपुराव्यामुळे पुन्हा हा निधी प्राप्त झाला असून, काम दर्जेदार होण्यासाठी आम्ही ही सर्व नगरसेवक लक्ष घालू अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बर्डे, संतोष पंडुरे, नगरसेवक सुनील वाघ, सचिन नागपुरे, रणजीत सोनवणे, दिनेश व्यवहारे, सचिन वडांगळे, जितेंद्र कुर्हे, राजेंद्र मापारी, अल्ताफ पठाण, मनोज पारखे, बापू देवढे, असीफ पठाण, कृष्णा गायकवाड, महेश डांगे, सचिन गव्हाणे, अजय त्रिभुवन, वनसाबाई सुखधान, आशा चक्रनारायण, लता गंधारे, मंगल गव्हाणे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नगरसेविका सुखधान यांनी आभार मानले.