नववर्षाच्या पूर्वसंध्येला संगमनेरातील दोन गटांत तुंबळ; एकाला भोकसले! शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत केली दोघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघं शहर नववर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचा आनंद लुटीत असतांनाच शहरातील मदिनानगर परिसरात दोन गटांत तुंबळ झाल्याचे धक्कादायक वृत्त येवून धडकले आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री गप्पा मारीत बसलेल्या एका गटाशी किरकोळ कारणावरुन वाद घालीत दुसर्‍या गटातील तिघांनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात चाकूसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर झाल्याने एक तरुण अत्यवस्थ झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ज्या भागातून गोवंशाचे रक्त वाहत होते, तेथेच गुरुवारी रात्री मानवी रक्ताचा सडा पडल्याचे वृत्त मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले, त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले असून एक संशयित अल्पवयीन असल्याचा कयास असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.31) रात्री साडे दहाच्या सुमारास कत्तलखान्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मदिनानगर परिसरात घडला. या भागातील गल्ली क्रमांक एकमधील एका घराच्या ओट्यावर दोघे तरुण गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी तेथे येवून ‘तुम औरतों को देखकर क्यो चिल्लाते हो?, यहाँ बैठने की जगह हैं क्या?’ असे म्हणत ‘त्या’ तरुणांना दमबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावर त्यातील साहील रशिद मनियार याने ‘आम्ही 31 डिसेंबर असल्याने गप्पा मारीत बसलो आहोत, आम्ही महिलांकडे पाहून ओरडत नाही’ असे प्रत्युत्तर दिले.


त्याचा राग येवून तेथे आलेल्या तिघांनी त्या साहिल व त्याचा मित्र अरशद या दोघा तरुणांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ व दमदाटी करीत साहील मनियार याच्या पोटात डाव्या बाजूस चाकूने भोकसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांची आरोडाओरड ऐकून तेथे आसपासचे रहिवासी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. सदरची बाब जखमी तरुणाच्या घरी समजल्यावर त्याचे वडिल व भावाने तेथे धाव घेवून त्या दोघांनाही उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यातील साहिलची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


या प्रकरणी जखमी झालेल्या तरुणाचा भाऊ सोहेल रशिद मनियार याने आज (ता.1) पहाटे साडेतीन वाजता शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अब्रार रऊफ शेख, इम्रान रऊफ शेख व एका अल्पवयीन तरुणावर खूनाचा प्रयत्न, जबर मारहाण करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी भा.द.वी.च्या कलम 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन यातील दोन्ही आरोपींना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. यातील तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याचा संश असल्याने पोलीस त्याच्या जन्माच्या तारखेची पडताळणी करीत आहेत, त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.


या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक रोहिदास माळी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण करीत या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व संशयितांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून एकाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का यासह हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे हस्तगत करण्यासाठी त्या दोघांच्याही कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरिक्षक माळी यांच्याकडे देण्यात आला आहे.

मदिनानगरमधील सदरचा भाग गोवंश जनावरांच्या कत्तलीचे ठिकाण म्हणून गेल्या काही वर्षात समोर आला आहे. एरव्ही या भागातून गोवंशातील जनावरांच्या रक्ताचे पाट वाहत असतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मात्र किरकोळ कारणावरुन दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला होवून एकाच्या पोटात चाकू भोकसण्यात आल्याने या परिसरात मानवी रक्ताचा सडा पडला होता. या हल्ल्यामागे इतके किरकोळ कारण असेल यावर पोलिसांना भरवसा नसल्याने अटक केलेल्या आरोपींच्या कोठडीतून या हल्ल्यामागील नेमक्या कारणाचाही उलगडा होणार आहे.

Visits: 100 Today: 2 Total: 1104448

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *