रणखांब येथील संतप्त शेतकर्याने फ्लॉवरवर फिरविला रोटाव्हेटर
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील साहेबराव काशिनाथ शेजवळ या शेतकर्याची फ्लॉवर व्यापार्याने मातीमोल भावाने मागितल्याने संतप्त झालेल्या शेजवळ यांनी एकरभर फ्लॉवरवर अक्षरशः ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरविला. सध्या फ्लॉवरला अवघा एक रुपया किलो भाव मिळत असल्याने सर्व खर्च अंगावर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
शेतकरी साहेबराव शेजवळ यांनी फ्लॉवरला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून आपल्या एक एकर क्षेत्रात फ्लॉवर रोपांची लागवड केली होती. मात्र आता फ्लॉवर पीक काढणीस व विक्रीस आले असताना त्यांनी व्यापार्यांनाही फ्लॉवर पाहण्यास शेतात बोलावले होते. परंतु, एक रूपया किलो भाव ऐकून शेजवळ यांनी डोक्यालाच हात लावला आणि ते चांगलेच संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी थेट फ्लॉवर पिकावर अक्षरशः ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरविला. जवळपास सर्व खर्च पन्नास हजार रुपयांच्या आसपास झाला होता पण हाती एक रुपया देखील आला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर, मेथी व शापू यांचीही अशीच परिस्थिती होती. काही शेतकर्यांनी मेंढ्या सोडल्या तर काहींनी रोटाव्हेटर मारले. एका मागून एक संकटांनी शेतकर्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या बाजारभाव कोसळल्याने नेमकी पिके तरी कोणती घ्यावी असा प्रश्नही शेतकर्यांनी केला आहे.