एकरुखे येथील तरुणांचे अनोखे सामाजिक उत्तरदायित्व… मतिमंद मुलाची आणि कुटुंबियांची काही दिवसांतच घडवून आणली भेट
धनंजय वाकचौरे, राहाता
तालुक्यातील एकरुखे येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी नुकतेच सामाजिक उत्तरदायित्वाचे अनोखे दर्शन घडवले आहे. मतिमंद मुलाला मायेचा आधार दिला. आणि भूक शमवत शिर्डीतील साईआश्रया सेवाभावी संस्थेकडे सुपूर्द केले. मात्र यानंतर विशेष घडले. आपल्या मतिमंद मुलाला शोधण्यासाठी परिवार जंग जंग पछाडत होता. त्यातच मध्यंतरी योगेश मुनावत हे नाशिकला काही कामानिमित्त गेले असता त्यांना ‘मुलगा हरवला आहे’ असा फलक दिसला. त्यांनी तात्काळ परिवाराशी संपर्क साधून मुलगा सापडला असल्याचे कळविले. गुरुवारी (ता.31) मतिमंद मुलाच्या परिवाराने साईआश्रयाला भेट देत मोठ्या आनंदात आपल्या ताब्यात घेतले. त्यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 19 डिसेंबर, 2020 रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एक मतिमंद मुलगा राहाता तालुक्यातील एकरूखे येथे एकटाच फिरताना आढळून आला होता. त्याची गावातील तरुणांनी विचारपूस केली असता त्याला काहीही सांगता येत नव्हते. तेव्हा येथीलच धनंजय सोनवणे, योगेश मुनावत, नवनाथ गाढवे व अविनाश डोखे यांनी त्याला आधार देऊन प्रेमाने चौकशी करून जेवण दिले. त्यानंतर मतिमंद मुलाला रात्रभर कोठे ठेवणार? असा प्रश्न पडला होता.
यातील काही तरुणांनी शिर्डी येथील साईआश्रया अनाथाश्रम संस्थेला संपर्क केला. संस्थेचे संचालक गणेश दळवी यांनीही तरुणांच्या हाकेला प्रतिसाद देत मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि रात्री दहा वाजता मुलाला संस्थेत दाखल करून घेतले. त्यानंतर संस्था व एकरूखे येथील धनंजय सोनवणे यांनी त्या मुलाच्या छायाचित्राच्या आधारे महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाणे व व्हाट्सअॅप ग्रुपवर मुलगा सापडला असल्याची माहिती टाकली. मध्यंतरीच्या काळात योगेश मुनावत हे नाशिकला काही कामानिमित्त गेले असता त्यांना ‘मुलगा हरवला आहे’ असा फलक दिसला. त्याचक्षणी त्यांनी फलकावरील क्रमांकावर सपंर्क करत कुटुंबियांना मुलगा शिर्डी येथे सुखरूप असल्याची बातमी दिली. त्यावर कुटुंबियांनी साईआश्रया अनाथाश्रमात येऊन डोळे भरुन मुलाला बघताच आनंदाश्रू वाहू लागले.
गुरुवारी शिर्डी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी प्रवीणकुमार लोखंडे, तपासी अधिकारी आढाव, गणेश दळवी, धनंजय सोनवणे, योगेश मुनावत, नवनाथ गाढवे, पत्रकार आदिंच्या उपस्थितीत मतिमंद मुलगा सोमनाथ दत्ता याला कुटुंबियांकडे सुपूर्द केले. या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल तरुणांचे आणि ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकरूखे परिसरात जेव्हा अनाथ मुले सापडतात, अपघात होतात तेव्हा कोण कुठला असे न पाहता क्षणाचाही विलंब न करता आम्ही मदतीला धावून जातो. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मदत, कृषी, कायदा, शासकीय योजना, पर्यावरण, करियर, रोजगार, सामाजिक क्षेत्र आदी विषयांच्या मार्गदर्शनसाठी कुठलाही आर्थिक मोबदला न घेता आम्ही काम करतो. – धनंजय सोनवणे (ग्रामस्थ, एकरूखे)
मी नाशिकमध्ये मुलाला शोधण्यासाठी सायकलवर जंग जंग पछाडत होतो. मध्यंतरी योगेश मुनावत यांचा मला फोन आणि समजले मुलगा सापडला आहे. या सुखद बातमीने आम्ही सर्व आनंदित झालो. तात्काळ शिर्डीतील साईआश्रया अनाथालयास भेट देऊन मुलाला ताब्यात घेतले. या अलौकिक कार्याबद्दल तरुणांचे आणि संस्थेचे मनापासून आभार.
– मतिमंद मुलाचे वडील