सामाजिक माध्यमात हिंदू देवतांवर आक्षेपार्ह मजकूर! सामंजस्याने राखली शांतता; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनातील मळमळ ओठांवर आली की त्यातून विध्वंसक प्रकारच जन्माला येतात. त्यासाठी आता सामाजिक माध्यमांचाही जोरकसपणे वापर होवू लागला असून त्यातून दोन समाजात तेढ वाढवण्याचा घाट घातला जात आहे. संगमनेरातूनही पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला असून मित्राच्या मोबाईलचा वापर करुन एकाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ‘रामायणा’वरील चर्चेत आक्षेपार्ह टिपण्णी केली. सदरचा प्रकार आठवडाभराने लक्षात आल्यानंतर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्याला त्याची कल्पना देत तक्रारही दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी नाईकवाडपुरा परिसरात राहणार्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाविरोधात जातीय तेढ निर्माण करण्याचे कृत्य केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस ठाण्यात जमलेल्या हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांनी सामंजस्य दाखवल्याने आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतरही शहरातील शांतता कायम आहे.

याबाबत पंकज शिंदे या तरुणाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता.४) सदरील तरुण समाज माध्यमातील इन्स्टाग्राम सोशल नेटवर्किंग या साईटवरील ‘रिल्स’ बघत होता. त्यातच एका तरुणाने शेअर केलेली रामायणावर आधारित एक रिल्स त्याच्या पाहण्यात आली. ती पाहून त्याखाली असलेल्या प्रतिसाद कप्प्यात कोणी काय रिप्लाय दिलाय (कमेंट) हे पाहत असताना शिंदे यांना ‘सुहान ७’ या नावाने इन्स्टाग्राम खाते असलेल्या एकाने कोट्यवधी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या राधा-कृष्णावर अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट केल्याचे त्यांना दिसून आले.

याबाबत शिंदे यांनी आपल्या मित्रांना माहिती देत सदरील इन्स्टाग्राम खाते कोणाचे आहे याचा शोध घेतला असता ते सुहान समीर खान याच्या नावावर असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्याचा ठावठिकाणा शोधून नाशिक महामार्गावरील हॉटेल प्रसादजवळ काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी त्याला गाठले. यावेळी सदरील वादग्रस्त पोस्टबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्या मोबाईलवरुन मित्राने पोस्ट केल्याचे सांगितले. त्यानुसार पोस्ट करणार्या ‘त्या’ तरुणालाही फोन करुन बोलावण्यात आले. यावेळी त्याने आपणच मित्र सुहान खानचा मोबाईल घेवून सदरील पोस्ट केल्याची कबुली दिली.

त्यावर हिंदुत्त्ववादी तरुणांनी ‘त्या’ दोघांनाही सोबत घेत थेट शहर पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना सांगितला. त्यांनी त्यावर तत्काळ कारवाईच्या सूचना देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावेळी सदरील अल्पवयीन असलेल्या १७ वर्षीय तरुणाने २८ ऑगस्ट रोजी अनावधानाने आपल्याकडून अशाप्रकारची गोष्ट घडल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. याप्रकरणी पंकज शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरुन शहर पोलिसांनी नाईकवाडपुरा परिसरात राहणार्या १७ वर्षीय तरुणाविरोधात आक्षेपार्ह कृती करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यावरुन भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०५ (२) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मध्यंतरी अहमदनगरच्या मुकुंदनगर परिसरात एका जुलुसमध्ये काही समाज विघातक प्रवृत्तींनी क्रूरकर्मा औरंगजेबाची प्रतिमा उंचावून नंगानाच केला होता. त्याचे पडसाद आजही उमटत असताना ‘त्या’ प्रकारानंतरही सौहार्द कायम असलेल्या संगमनेरात मात्र काहींकडून शांततेला नख लावण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. सोमवारी उजेडात आलेला आणि मंगळवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल झालेला सदरचा प्रकारही या उद्योगातीलच एक भाग असण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी सदरील प्रकरण हलक्यात न घेता त्याच्या मूळात जावून तपास करण्याची गरज आहे.

सोमवारी सायंकाळनंतर या प्रकरणावरुन शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही बाजूचे नागरिक जमले होते. यावेळी आगामी कालावधीत होणारा गणेशोत्सव व विसर्जनाच्या दिनी येणारी ईद यांचा विचार करुन शहरातील सौहार्द टिकवण्यावर अधिक भर देण्यात आला. सदरील तरुणाने समाज माध्यमात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले जावू शकत नाही अशी भूमिका मुस्लिम समाजानेही घेतल्याने दोन्ही समाजाच्या सामंजस्य भूमिकेतून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करुन या विषयावर पडदा टाकण्यात आला.

सोशल माध्यमांचा सकारात्मक वापर केल्यास त्यातून खूप काही साध्य करता येते, तर त्याचा नकारात्मक वापर झाल्यास दोन समाजात तेढ निर्माण होण्यासह सामाजिक सलोखाही बाधित होतो. संगमनेरात घडलेल्या या प्रकारातूनही शहरातील जातीय सलोखा गढूळ करण्याचाच प्रयत्न झाला होता. मात्र हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांनी संगमनेरच्या जातीय सौहार्दाला प्राधान्य दिल्याने सदरील प्रकारानंतरही संगमनेरातील वातावरण शांत आहे.

