ज्यांची सांभाळली मुलगी तेच झाले जीवाचे वैरी! प्रेमप्रकरणातून मुलगा तुरुंगात तर आई-वडीलांची आत्महत्या..

नायक वृत्तसेवा, अकोले
पोटच्या मुलीसमान सांभाळ केलेल्या मुलीशीच आपल्या मुलाचे सूत जुळले आणि त्यातून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. एकाच छताखालचा मामला असल्याने ते प्रेम फुलले आणि त्यातून दोघांतही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून अल्पवयीन असलेली मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार समजताच तिच्या जन्मदात्यांच्या मनात लालसा निर्माण झाली आणि या लालसेने सुखी संसारात रमलेल्या एका कुटुंबाची पूर्ण राखरांगोळी केली. या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसलेल्या मुलाच्या आई-वडीलांचे नाव गोवले गेल्याने मानसिक धक्क्यासह सामाजिक इज्जतीच्या भयाने त्या दोघांनीही गळफास घेतला तर मुलगा गजाआड गेल्याने एका चांगल्या कुटुंबाची अक्षरशः वाताहत झाली. या प्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील चिंचावणे येथे राहणार्‍या सोमनाथ नामदेव कुलाळ (वय 50) व जिजाबाई सोमनाथ कुलाळ (वय 45) या दोघांना समीर आणि दीपक ही दोन अपत्ये. सोमनाथ कुलाळ यांनी आपल्याच संबंधातील एका नातेवाईकाच्या परिस्थितीला साथ म्हणून त्यांच्या मुलीचा लहानपणापासून सांभाळ केला. आपली दोन्ही मुले आणि सोबत दत्तक म्हणून सांभाळ करीत असलेली मुलगी असा सुंदर संसार फुलत असताना कालांतराने सोमनाथ कुलाळ यांचा मुलगा समीर आणि ‘त्या’ मुलीमध्ये एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होवून प्रेमसंबंध निर्माण झाले. आता एकाच छताखालचा हा मामला असल्याने एकमेकांना भेटणे, बोलणे याला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. त्यामुळे अल्पावधीतच या प्रेमाला रंग चढला.

सोबतच्या सहवासातून सुरुवातीपासूनच एकमेकांविषयी आकर्षण आणि त्यातून निर्माण झालेले प्रेम यामुळे त्या दोघांमधील मर्यादा हळूहळू संपत गेल्या आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, त्यातूनच ती मुलगी गर्भवती झाली. मात्र मुलगी अजून 18 वर्षांची पूर्ण नसल्याने पोटातील गर्भ सांभाळून मुलीचे वय पूर्ण होताच आपला मुलगा समीर याच्याशी तिचे धुमधडाक्यात लग्न लावून देण्याचा निश्चयही उभय दाम्पत्याने घेतला होता. त्यामुळे मुलीचे वय पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच ही गोष्ट मुलीच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी लागलीच चिंचावणे गाठून सोमनाथ कुलाळ व त्यांच्या पत्नीला नको ते बोलून मुलीच्या पोटातील गर्भ काढण्याचा आग्रह धरला. त्या दाम्पत्याने मात्र मुलगी वयात येताच तिचे लग्न लावून देणार असल्याने गर्भ पाडण्याची गरज नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र त्या दोघांनीही त्यांचे काहीएक न ऐकता मुलीसह थेट प्रवरा ग्रामीण रुग्णालय गाठले.

तेथे मुलीच्या पोटातील गर्भ काढण्यात आला, मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने रुग्णालयाच्या सूचनेवरुन लोणी पोलिसांनी रुग्णालयात जावून मुलीच्या ‘त्या’ दोन्ही नातेवाईकांचे जवाब नोंदविले. त्यात त्या दोघांनीही समीर याला त्याच्या आई-वडीलांनी प्रोत्साहन दिल्याने हा प्रकार घडल्याचा जवाब त्यांनी नोंदविला. त्यानुसार लोणी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी समीर कुलाळ या तरुणावर बलात्कार व पोक्सोतंर्गत तर त्याला साथ दिल्याच्या कारणावरुन त्यांच्या आई-वडीलांवरही शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होवून तो राजूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी समीरला बेड्या ठोकून त्याला तुरुंगात टाकले. आपला मुलगा तुरुंगात गेल्याची माहिती मिळाल्याने त्याचे आई-वडील प्रचंड तणावाखाली आले होते.

त्यातच मुलीच्या ‘त्या’ दोघा नातेवाईकांनी चिंचावणे येथे जात मुलाच्या आई-वडीलांकडे गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. झाला प्रकार या दाम्पत्याला मानसिक उध्वस्थ करणारा होता. आयुष्यभर ‘पांडुरंग हरी’ म्हणत समाजाचे भले करण्याचा विचार करणार्‍या कुटुंबावरच असा प्रसंग ओढावल्याने सोमनाथ कुलाळ व त्यांची पत्नी जिजाबाई पूर्णतः हादरले. त्यातच ज्या मुलीला आयुष्यभर पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळले, तिला सून म्हणून शेवटपर्यंत आपल्याच घरात ठेवण्याचा उदात्त विचार करुनही हे बालंट आल्याने व त्यातून समाजात मिळविलेली इज्जत धुळीस मिळण्याची भीती निर्माण झाल्याने त्या दोघांनीही एका विचाराने 17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातील आढ्याच्या लोखंडी पाईपला गळफास बांधून या जगाचा निरोप घेतला. ही घटना चिंचावणे परिसरातील प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी होती.

या घटनेनंतर मयताचा मुलाचा दीपक सोमनाथ कुलाळ याने राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मुलीचे नातेवाईक असलेल्या शीतल रामा काठे (रा.खडकी, ता.अकोले) व तिचे वडील मारुती नाना मुठे (रा.सातेवाडी, ता.अकोले) या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 306, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एन.खैरनार करीत आहेत. या घटनेने चिंचावणे परिसरासह संपूर्ण अकोले तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पैशांच्या लालसेने एका सुखी संसाराची अशा पद्धतीने वातावहत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Visits: 116 Today: 1 Total: 1109948

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *