खंदरमाळवाडीमध्ये पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होईना…! वन विभागासह भयभीत झालेल्या शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

नायक वृत्तसेवा, घारगाव
तालुक्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथे वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला, परंतु पिंजरा लावूनही बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नांदूर खंदरमाळ, बावपठार आदी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्‍यांसह नागरिक घराबाहेर पडण्यासही धजावत नाही. रात्रीच्या वेळी शेतीपिकांना पाणी भरणेही अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर भयभीत झालेल्या शेतकर्‍यांनी पिंजरा लावण्याची वन विभागाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वन विभागानेही तात्काळ परिसरात पिंजरा लावला.

परंतु, पिंजरा लावून जवळपास तीन ते चार दिवस उलटले आहे. तरी देखील बिबट्या पिंजर्‍यात अडकला नाही. वारंवार पिंजर्‍याजवळून जाऊनही जेरबंद होत असल्याने वन विभागासह शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. तत्पूर्वी, बिबट्याने परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालत पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत ठार केले आहे. त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद होईल याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116706

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *