‘भारत बंद’ला संगमनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणाच्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ सकाळपासूनच शहर कडकडीत बंद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्रातील भाजप सरकारने विनाचर्चेने लागू केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांना विरोध करत हे कायदे तात्काळ मागे घ्यावेत. या मागणीसाठी आणि दिल्लीत सुरू असलेल्या पंजाब, हरियाणाच्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यात नागरिकांनी ‘भारत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्यावतीने केंद्रातील भाजप सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात भारत बंदमध्ये संगमनेरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी व मित्र पक्षांच्यावतीने संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर शहरातील सर्व बाजारपेठा, व्यापारी दुकाने, शेतमाल विक्री, वाहतूक बंद होती. ग्रामीण भागातही तळेगाव, साकूर, निमोण, वडगाव पान, धांदरफळ, जवळेकडलग अशा मोठ्या गावांसह सर्व गावांमधून छोटे-मोठे व्यवहार बंद करण्यात आले होते.
घुलेवाडी फाट्यावर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोही केला होता. या बंदमध्ये समाजवादी जनपरिषद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, छात्रभारती, एकता सेवाभावी संस्था, समाजवादी जनपरिषदेने सहभागी होत उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला. तर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. मात्र शेतकर्यांच्या मागणीकडे केंद्र सरकार नकारात्मक दृष्टीने पाहत असून, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. संपूर्ण भारत एकवटला असून, हे काळे कायदे तातडीने रद्द करावे. अन्यथा भारतामध्ये होणार्या जनउद्रेकास केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार राहणार आहे.
– डॉ.सुधीर तांबे (सदस्य, विधान परिषद)
सोशल मीडियावरही ‘बंद’ची धूम…
विविध समाज माध्यमांवर तरुणांनी व नागरिकांनी भारत बंदला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांविरुद्ध आवाज उठवला. सोशल ग्रुपच्या, फेसबुक व इतर समाज माध्यमांवर ‘भारत बंद’ला उत्स्फूर्त पाठिंबा दिसून येत होता. तर केंद्र सरकारवर सडकून टीका सुरू होती.