कुख्यात ‘सलीम-अलीम’सह सहाजणांची ‘टोळी’ पकडली! संगमनेर पोलिसांची दमदार कामगिरी; दरोड्याच्या तयारीवरच घातला घाला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाढत्या गुन्हेगारी घटनांमधून वारंवार भंग होणार्या शांततेत चोर्यांसह घरफोडीच्या घटनांचीही भर पडल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण झाले असतानाच संगमनेर पोलिसांच्या डायरीत काहीसा दिलासा देणार्या कामगिरीची नोंद झाली आहे. एव्हाना एमडी, सुकेवाडीसह गोल्डनसिटीतला गांजा, बसस्थानक व अन्य भागातील चोर्यांसह कितीतरी घटनांमधून निष्क्रियतेचा ठसा उमटलेल्या शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने रविवारी मध्यरात्री दमदार कामगिरी बजावली. रात्रीच्या अंधारात सशस्त्र सहाजणांकडून सावज हेरण्याचे षडयंत्र रचले जात असतानाच पोलीस पथकाने जीवावर उदार होत त्यांच्यावर छापा घातला. अचानक हातात पिस्तुल घेवून पोलीस उभे ठाकल्याचे पाहून दोघा-तिघांनी आपल्याकडील हत्याराचा धाक दाखवून निसटण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो फूस्स ठरला. यावेळी पोलिसांनी मोठ्या हिंमतीने सशस्त्र सहाजणांना गुडघ्यावर आणून त्यांच्याकडून घडणारा संभाव्य गुन्हा रोखला. विशेष म्हणजे पोलिसांनी या सगळ्यांच्या तोंडावरील मुखवटे हटवताच हाती लागलेली टोळी शहरात धुमाकूळ घालणार्या कुख्यात ‘सलीम-अलीम’ची असल्याचेही उघड झाल्याने त्यांच्या तपासातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.2) पहाटे दोनच्या सुमारास करण्यात आली. सध्या गोवंशाच्या कत्तलीवरुन शहराचे वातावरण वारंवार तापत असल्याने पोलिसांनी कत्तलीच्या संभाव्य ठिकाणांसह चोरट्या मार्गाने आणलेली जनावरे लपवून ठेवल्या जाणार्या संभाव्य ठिकाणांवरही आपली करडी नजर ठेवली आहे. त्यासाठी पोलिसांचे गस्तीवाहन वारंवार संशयीत ठिकाणी गस्तही घालत असते. रविवारी (ता.1) रात्रीही पोलिसांकडून गस्त सुरु असताना रात्री अकराच्या सुमारास तीन दुचाकीवरुन काहीजण दरोडा घालण्याच्या तयारीत कोल्हेवाडी रस्त्यावर फिरत असल्याची माहिती गस्ती पथकाला मिळाली.

त्यानुसार पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक संतोष पगारे, हवालदार बाबा सातपुते, कॉन्स्टेबल खेडकर व चालक विजय खुळे यांनी आपले लक्ष या परिसरावर केंद्रीत करीत गस्त वाढवली. आज (ता.2) पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांकडून या परिसरात संशयीतांचा कसून शोध सुरु असतानाच कोल्हेवाडी रस्त्यालगतच्या काटवनात काहीजण दुचाकी उभ्या करुन थांबल्याचे पथकाने पाहिले. मात्र पोलिसांचे वाहन त्यांच्याजवळ येताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीवावर उदार होत पाठलाग करुन त्यातील पाचजणांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यातील दोघांनी आपल्याकडील शस्त्रांचा धाक दाखवून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यातील एकाला जागीच आडवे करीत दुसर्याकडे झेप घेण्यापूर्वीच एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पकडलेल्या पाचजणांच्या टोळक्याकडून होन्डा स्प्लेंडर, होन्डा शाईन आणि प्लॅटिना अशा तीन दुचाकींसह पक्कड, कोयते. स्कू-ड्रायव्हर, गुप्ती, लाखंडी पान्हे, कुर्हाड आणि मिरची पावडर जप्त करीत त्यांच्या तोंडवरील स्कार्प उतरवले असता पहिलाच आरोपी कुख्यात अलीम अकबर पठाण (वय 26, रा.जमजम कॉलनी) असल्याचे समोर आले. उर्वरीत आरोपींची ओळख पटवली असता त्यात वसीम मंसूर शेख (वय 38, रा.मदिनानगर), नीलेश बाळासाहेब शेळके (वय 40, रा.वाघापूर), सलमान अकबर पठाण (वय 24, रा.कोल्हेवाडी रोड) व अनमोल कुरनवासी चव्हाण (वय 20, रा.घुलेवाडी) यांचा समावेश होता. पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीची माहिती विचारली असता त्याचे नाव सलीम अकबर पठाण (वय 26, रा.जमजम कॉलनी) असल्याचे समजल्यावर ही कुख्यात ‘सलीम-अलीम’ची टोळी असल्याचेही स्पष्ट झाले.

पोलिसांनी लागलीच घटनास्थळावरुन पसार झालेल्या सलीम पठाणचाही माग काढीत त्याला पहाटेच तीनबत्तीजवळ जेरबंद केले. या कारवाईत चोर्या, घरफोड्या करण्यात सराईत असलेली आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर अनेक गुन्ह्यांची नोंद असलेली ‘सलीम-अलीम’ची अख्खी टोळीच पोलिसांच्या हाती लागल्याने त्यांच्या चौकशीतून शहर व तालुक्यात घडलेल्या अन्य चोर्या व घरफोडीच्या घटनांची उकल होण्याची दाट शक्यता आहे. या कारवाईने गेल्याकाही दिवसांपासून निष्क्रियतेचे आरोप झेलणार्या शहर पोलिसांना मान वर काढण्यास वाव मिळाला असून या संधीचा त्यांच्याकडून कसा वापर केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सहाही जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या राजकीय परिवर्तनाचा संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला असून शहरात अतिशय घातक असलेल्या एमडी, गांजा यासारख्या अमलीपदार्थांवरील संशयात्मक तपासासह सातत्याने घडत असलेल्या चोर्या व घरफोडीच्या घटनांचे तपासही रखडले आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाईच होत नसल्याने शहरातील घटनांमध्येही वाढ झाली असून एकंदरीत अव्यवस्थेचे दर्शनही घडत आहे. अशात पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघत असतानाच कुख्यात दरोडेखोरांची मोठी टोळी हाती लागल्याने शहर पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पकडलेल्या टोळीच्या चौकशीतून शहर व परिसरातील काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली जाणार आहे.

