‘इको फे्रन्डली’ देखाव्याची परंपरा जोपासणारे साळीवाडा मंडळ! देवीदास गोरे यांनी शंभर भेल्यांचा वापर करुन वास्तवात साकारला ‘गुळाचा गणपती’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सव्वाशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या साळीवाडा गणेशोत्सव मंडळाने सालाबाद प्रमाणे ‘इको फे्रन्डली’ देखाव्यांची आपली पंरपरा यंदाही कायम ठेवली आहे. यावर्षी मंडळाने केवळ शाब्दीक कोटी करण्यासाठी वापरण्यात येणार्या वाक्य प्रयोगाला वास्तवात आणताना वेगवेगळ्या आकाराच्या शंभर भेल्यांचा वापर करुन चक्क ‘गुळाचा गणपती’ साकारला आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून रोजच्या वापरातील साहित्याचा वापर करुन शिल्पकार देवीदास गोरे या मंडळाचा देखावा तयार करतात. मंगळवारी संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्या हस्ते या देखाव्याचा शुभारंभ झाला.
मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात सन 1895 साली सावर्जनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत रंगारगल्लीतील सोमेश्वर मंदिरात पहिल्यांदा श्रींची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1896 साली मेनरोडवरील कोष्टी समाजाच्या चौंडेश्वरीमाता मंदिरात तर 1897 साली कॅप्टन लक्ष्मी चौकातील साळी समाजाच्या लक्ष्मीनारायण मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करुन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होवू लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंदिरांचा वापर होत. गणेशोत्सवातील दहा दिवस भजन-कीर्तन आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजिले जात, त्यातून मनामनात राष्ट्रभावना प्रज्ज्वलित करुन त्याचा स्वातंत्र्य लढ्यासाठी वापर होत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात संगमनेरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करणार्या मंडळांना मानाचे गणपती समजले जातात.
मानाच्या गणपती मंडळांच्या यादीत तिसर्यास्थानी असलेल्या साळीवाडा मंडळाने नेहमीच सामाजिक आणि पर्यावरणपूरक देखाव्यांचे सादरीकरण केल्याचा इतिहास आहे. साळीवाडा मंडळाचे शिल्पकार विलास निर्हाळी यांच्या प्रेरणेतून 1988 सालापासून मंडळाने ‘इको फे्रन्डली’ देखावे सादर करण्यास सुरुवात केली. गेल्या साडेतीन दशकांच्या काळात मंडळाने स्टीलची भांडी, विघटित होणारे चहाचे प्याले, विविध प्रकारच्या यंत्रांची सामग्री, वाहनांचे टायर, खेळाचे साहित्य, भाजीपाला, सिमेंटचे पाईप, कागदी खोके, प्लॅस्टिकचे वेगवेगळे सामान, बटाटे, रंगाचे डबे, फरशीचे तुकडे, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, पॅकिंगचा कागद, मातीची भांडी, भाजीपाल्याचे क्रेट, संगणकाचे सामान, दुचाकीचे सामान, वेगवेगळ्या आकाराचे फुगे यापासून गणेश प्रतिमा साकारुन शिल्पकार देवीदास गोरे यांनी दरवर्षी नाविन्याचा अविष्कार सादर केला आहे.
‘इको फे्रन्डली’ देखाव्यांची साडेतीन दशकांची परंपरा जोपासताना मंडळाने यंदा विविध आकाराच्या छोट्या-मोठ्या गुळाच्या भेल्या वापरुन तयार केलेला देखावा आकर्षण ठरले आहे. देखाव्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य पुन्हा उपयोगात आणले जाते, त्यामुळे यंदाचा देखावा सादर करण्यासाठी वापरलेला गुळ विसर्जनाच्या दिनी प्रसाद म्हणून वाटला जाणार आहे. गुळापासून तयार झालेला जवळपास पाच फूट उंचीचा हा देखावा मंगळवारी पाहण्यासाठी खुला करण्यात आला. यावेळी संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष व दैनिक नायकचे संपादक गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय अहिरे, पत्रकार श्याम तिवारी, नितीन ओझा, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, सोमनाथ काळे, नीलिमा घाडगे, मंगेश सालपे आदिंसह साळीवाडा मंडळाचे शैलेश कलंत्री, राजेंद्र निर्हाळी, यतीन भागवत, बाळासाहेब गुंजाळ, संतोष उनवणे, महेश जवरे, आकाश निर्हाळी, जीवन गिरगुणे व अंकीत परदेशी आदी उपस्थित होते.
साळीवाडा गणेश मंडळाचे शिल्पकार दिवंगत विलास निर्हाळी यांनी प्रोत्साहन दिल्याने सन 1988 पासून मी मंडळाचे देखावे ‘इको फे्रन्डली’ पद्धतीने साकारण्यास सुरुवात केली. गेल्या साडेतीन दशकांत दोन पिढ्यांचे परिवर्तन घडले असले तरीही मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची पंरपरा मात्र आजही कायम ठेवली आहे. मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने आतम्ही दरवर्षी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करुन देखावा तयार करतो. यावर्षी तयार केलेला गुळाचा गणपती नक्कीच संगमनेरकरांना आवडेल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे.
– देवीदास गोरे
कला शिक्षक व शिल्पकार