प्रिंपी-लौकीतील चोवीस जणांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल जाब विचारायला गेलेल्या महिलेला केली जातीवाचक शिवीगाळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पिंप्री-लौकी आजमपूर येथे धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व अपमान करुन थेट फाशी देऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात 24 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत भाऊसाहेब सखाराम सातपुते यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घरासमोर मोठ्याभाऊ गणपत लावरे याने सुमारे एक वर्षांपूर्वी पत्र्याचे शेड बांधले होते. 14 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास या शेडला मोठ्याभाऊ लावरे व त्याचे नातेवाईक असलेले भास्कर लावरे, गणेश लावरे, किरण लावरे, राजू लावरे, नामदेव लावरे, संपत लावरे, शंकर लावरे, भीमा लावरे, सोपान लावरे, भागवत लावरे, प्रदीप लावरे, विठ्ठल लावरे, बबन लावरे, दिलीप लावरे, जालिंदर लावरे, मनोहर लावरे, साहेबराव लावरे, संपत लावरे, दामू लावरे, लहानू लावरे, पाराजी लावरे, भीमा लावरे, बाबुराव लावरे हे शेडला चारही बाजूने जाळी लावत होते.


यावेळी त्यांनी आमच्या घरासमोरील धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे धान्याची गोणी फुटल्याने माझ्या पत्नीने त्यांना विचारणा केली असता या सर्वांनी ही जागा तुमच्या बापाची आहे का? तुमचं एकच घर आहे, तुम्हांला केव्हाही येवून मारुन टाकू असे म्हणून पत्नीला मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे व भागवत लावरे या तिघांनी ढकलून दिले. त्यामुळे ती घरासमोरील लोखंडी पलंगावर पडली व तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आहेत. यानंतर मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे, भागवत लावरे व नामदेव लावरे या चौघांनी माझ्या पत्नीला जातीवाचक बोलून तिचा अपमान केला व यांना फाशी देवून मारु असे म्हणत माझ्या सुनांना शिवीगाळ केली. तसेच माझा मुलगा प्रदीप याची सायकलही ढकलून दिली. याप्रसंगी विजय कदम, भास्कर गिते, योसेफ कदम, कारभारी दातीर, संजय लावरे हे उपस्थित असल्याने त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शेडची जाळी लावण्यात आली व जाळी काढून घेण्याचे कबुल करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्यांनी जाळी काढली नसल्याचे म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी वरील 24 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद क्रमांक 67/2021 भादंवि कलम 143, 147, 149, 323, 504, 506, 34 व अनुसूचित जाती-जमाती 3(1) (आर)(एस) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.

Visits: 166 Today: 1 Total: 1956006

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *