यूरिया खत खरेदीसाठी होतेय इतर औषधांची सक्ती भाजप किसान मोर्चाचे संगमनेर प्रांताधिकार्‍यांना निवेदन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
यूरिया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती शेतकर्‍यांना करून लूट केली जात आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करून केंद्र व राज्य सरकारची बदनामी थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्यावतीने प्रांताधिकार्‍यांकडे करण्यात आली. औषधांची सक्ती न थांबल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आला.

सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची पेरणीची कामे सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने खताची उपलब्धता करून दिलेली आहेत. मात्र यूरिया खताची खरेदी करताना संगमनेर शेतकी सहकारी संघातून तसेच काही दुकानदार आवश्यक नसलेल्या औषधांची सक्ती शेतकर्‍यांवर करीत आहेत. यामुळे शेतकर्‍यांची एकप्रकारे लूट होत असल्याची भावना व्यक्त होत असून, औषध घेतले तरच यूरिया खत मिळेल, असे सांगण्यात येते. यूरिया खत सरकारने उपलब्ध करून न दिल्याचा संभ्रम निर्माण करून दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकर्‍यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना भेटून निदर्शनास आणून दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. शेतकी सहकारी संघ तसेच काही दुकानांमधून यूरिया खत हवे असल्यास जाणीवपूर्वक इतरही औषधं खरेदी करण्याची सक्ती करून एकप्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. वास्तविक खताची उपलब्धता असतानाही शेतकर्‍यांना खत उपलब्ध करून न देणे ही एकप्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक असून, केंद्र आणि राज्य सरकारलाच बदनाम करण्यासारखे आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन शेतकर्‍यांवर होणारी औषधांची सक्ती तातडीने थांबवावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र थोरात, अमोल खताळ, अशोक कानवडे, रोहिदास साबळे, संजय मोरे, संदीप क्षीरसागर, अशोक नन्नवरे, सुयोग गुंजाळ, संदेश देशमुख, संजय पावसे यांच्यासह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


सदर प्रश्न केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी आहे. खत कंपनीकडून लिंकिंग प्रॉडक्ट घेतल्याशिवाय शेतकर्‍यांसाठी यूरिया खत मिळत नाही आणि जर लिंकिंग प्रॉडक्ट घेतले नाही तर शेतकर्‍यांसाठी यूरिया उपलब्ध होणार नाही. संगमनेर शेतकी संघाने कायम शेतकर्‍यांच्या मदतीची भूमिका घेतली असून त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सातत्याने गुणवत्तापूर्वक काम केले आहे. शिवाय संघ यूरिया खताबरोबर शेतकर्‍यांना लिंकिंग प्रॉडक्ट घ्यावे, असे बंधनकारक करत नाही.
– अनिल थोरात (व्यवस्थापक, संगमनेर शेतकी संघ)

Visits: 101 Today: 1 Total: 1424832

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *