अकोले तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद

नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ मंगळवारी (ता.8) अकोले तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

सोमवारी यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांचे अध्यक्षतेखाली विश्रामगृहावर बैठक झाली. कॉ.डॉ.अजित नवले, कारभारी उगले, बाळासाहेब नाईकवाडी, विनय सावंत, विलास नवले, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, शांताराम संगारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल नाईकवाडी, आरिफ तांबोळी, नितीन नाईकवाडी, गणेश कानवडे व अमित नाईकवाडी आदिंसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी ‘अकोले बंद’ ठेवण्याबाबत नियोजन करण्यात आले. कोतूळमध्ये ‘भारत बंद’च्या हाकेला अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच सर्व दुकाने चालू होती. तसेच राजूरमध्येही बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, दुपारी तीन वाजता अकोले बस स्थानकासमोर आभार सभा आयोजित करण्यात येऊन बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक धोरणांचा निषेध करण्यात आला.

Visits: 4 Today: 1 Total: 30456

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *