पुरुषी मानसिकतेमधून स्त्रियांकडे पाहू नये ः अॅड. गवांदे संत इथगानी चर्च व ख्रस्ती विकास परिषदेचा महिला मेळावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘नव्या युगाचे मी नव महिला जगेन स्त्री म्हणुनी मी न दासी मी न देवता जगेन माणूस म्हणुनी’ या उक्तीप्रमाणे पुरुषी मानसिकतेमधून स्त्रियांकडे न पाहता समानतेच्या दृष्टीकोनातून त्यांना पाहायला हवं, असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या व अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी केले.

संत इगनाथी चर्च व महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्यास संत इगनाथी चर्चचे प्रमुख धर्मगुरू सतीश कदम, सिस्टर जेसिंटा, दिनकर पगारे, रत्नाकर पगारे, अनिल भोसले, अॅड. विजयानंद पगारे, निर्मला भोसले, कमलबाई पवार, सविता पाळंदे, कांचन रूपटक्के, प्रशांत यादव, सिमोन रूपटक्के, सुखदेव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

अॅड. गवांदे पुढे म्हणाल्या, स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ज्यादिवशी होईल तो खरा महिला दिन असेल असे सांगून महिला दिनाचे महत्त्व, महिला सबलीकरण, महिलांचे आरोग्य व समाजातील त्यांचे स्थान या विषयांबाबत अतिशय सुरेख व सोप्या भाषेत त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. कारण की महिलांना आपल्या शिक्षणाचा समानतेचा व साधन संपत्तीचा हक्क मिळायला हवा असल्याचे फादर सतीश कदम यांनी म्हटले. जागर स्त्रीशक्तीचा सन्मान त्या मातेचा सन्मान नारी शक्तीचा प्रण व महिला सबलीकरणाचा जागर यावेळी महिलांमध्ये पाहावयास मिळाला. प्रास्ताविक अनिल भोसले यांनी तर दिनकर पगारे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
