कोपरगावमध्ये रुग्णवाढीस जनतेबरोबर प्रशासनही जबाबदार ः अ‍ॅड.पोळ

कोपरगावमध्ये रुग्णवाढीस जनतेबरोबर प्रशासनही जबाबदार ः अ‍ॅड.पोळ
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून नियमांचे पालन करण्याचेही केले आवाहन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात घेतलेली काळजी या काळात घेतली नसल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यास जनतेबरोबर प्रशासनही जबाबदार आहे, असे मत लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अ‍ॅड.पोळ पुढे म्हणाले, सुरुवातीच्या काळात देशाबरोबरच राज्यात व कोपरगाव शहरात कोरोना रुग्णसंख्या अतिशय कमी होती. त्यावेळी लॉकडाऊन करून साखळी तोडण्याचे प्रयत्न झाले. शहर व तालुक्यात साथीच्या रोगास रोखण्यात प्रशासन यशस्वी झाले. मात्र सद्या साथीच्या आजाराने तालुक्यात रौद्र रूप धारण केले असून जनतेबरोबर प्रशासन गंभीर नसल्यामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा 685 वर जाऊन पोहोचला आहे. तर सध्या 179 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत तालुक्यात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत स्त्राव तपासणी झालेल्या व्यक्ती 3 हजार 278 असून कोरोना उपचारानंतर बरे झालेले रुग्ण संख्या 469 आहे; असे असले तरी रोज विविध भागात सापडणार्‍या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोपरगाव शहर पुन्हा बंद करावे की सुरू ठेवावे असे वेगवेगळे मत प्रवाह निर्माण झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प असल्याने लॉकडाऊन करू नये अशी सर्वांचीच मागणी असली तरी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने पकड ढिली केल्यामुळे वाढती रुग्णसंख्या व मृत्यू पावणार्‍यांची संख्या वाढत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष व नागरिकांची सतर्कता कमी झाल्याने दुकाने, भाजी बाजार विविध ठिकाणी बिनधास्त होणारी गर्दी रात्रीची उठवलेली संचारबंदी यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *