वळणमध्ये अवैध दारूविक्री ‘पुन्हा’ सुरू; ग्रामस्थांत संतापाची लाट
वळणमध्ये अवैध दारूविक्री ‘पुन्हा’ सुरू; ग्रामस्थांत संतापाची लाट
राज्यमंत्री तनपुरेंच्या आदेशाला राहुरी पोलिसांकडून केराची टोपली
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. त्यानंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितले. तेव्हा तीन महिने दारूबंदी झाली. परंतु, कोरोना काळातील टाळेबंदीमध्ये राजरोसपणे दारूविक्री सुरू झाल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. यावरुन राज्यमंत्र्यांच्या आदेशाला राहुरी पोलिसांनी केराची टोपली दाखवत ग्रामस्थांवर अवैध दारूविक्रेते शिरजोर झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालल्याने अवैध दारूविक्रीतून मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यताही नागरिकांतून व्यक्त होत आहे.
वळण येथील ग्रामस्थ एका वर्षापासून दारूबंदीसाठी आग्रही आहेत. यासाठी ग्रामसभेत दारूबंदीचा ठरावही करण्यात आला. यासाठी अवघे गाव एकवटले. त्यानंतर वळण हद्दीतील मुळा नदीकाठावर चालणारी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी संघर्ष उभा राहिला. पोलीस पाटील व ग्रामस्थांनी आमच्या लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप दारू विक्रेत्यांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला. राहुरी पोलीस अवैध दारू विक्रेत्यांना पाठिशी घालतात, अशा भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्या. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने तरुण नेतृत्व मिळाले. विशेषतः त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे त्यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोठ्या गावांमध्ये जनता दरबार सुरु केले. वळण येथे जनता दरबारात ग्रामस्थांनी अवैध दारूविक्री बंद कराव अशी आग्रही भूमिका मांडली.
राज्यमंत्री तनपुरे यांनी तत्कालीन प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.सागर पाटील यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून, वळण येथील अवैध दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले. तसे त्यांनी जनता दरबारात जाहीरपणे सांगितले. तात्काळ राहुरी पोलिसांचे पथक दाखल झाले. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तीन महिने दारूविक्री बंद झाली. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एप्रिल महिन्यापासून कोरोना महामारीमुळे टाळेबंदी सुरू झाली. तालुक्यात अवैध धंदे वाढले. वळण येथे बंद झालेली अवैध दारूविक्री मागील पाच महिन्यांपासून जोमाने सुरू झाली. राहुरी पोलिसांच्या अर्थपूर्ण पाठबळावर दारू विक्रेते ग्रामस्थांवर शिरजोर झाले असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. तर राज्यमंत्र्यांचा आदेश राहुरी पोलीस विसरले असल्याचे अधोरेखित होत आहे.