अकोलेत ‘माझे गाव माझे दुकान’ जनजागृती मोहीम दीपावलीची खरेदी गावात अथवा तालुक्यातच करण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, अकोले
आपल्या गावातील व्यापारी, व्यावसायिक यांच्या हितांचे रक्षण दिवाळीच्या काळात व्हावे या हेतूने रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्यावतीने ‘माझे गाव माझे दुकान’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आपली खरेदी शक्यतो आपल्या गावात अथवा तालुक्यातच करण्याचे आवाहन रोटरी क्लबने केले आहे. त्यादृष्टीने लक्षात असू ‘आपली माती, आपली माणसं’ अशी साद रोटरी क्लबने घातली आहे.

सध्या ग्राहक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी करताना दिसत आहे, हे ऑनलाईन खरेदीचे वेड छोट्या-छोट्या गावांपर्यंत पोहचले आहे. शिवाय अनेकजण खरेदीसाठी नजीकच्या शहरात जाताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या गावामधील, शेजारच्या गावातील, आपल्याच तालुक्यातील व्यावसायिकांच्या छोट्या-मोठ्या व्यवसायावर याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या गावातील आपल्या दुकानात, आपली खरेदी अकोले तालुक्यातच व्हावी व त्याचा फायदा आपल्याच माणसांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व्हावा या हेतूने रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्यावतीने ही चळवळ सुरु करण्यात आली आहे.

तालुक्यातील सुगाव फाटा, इंदोरी फाटा, मेहेंदुरी, कारखाना चौक, देवठाण रस्त्यावरील अगस्ती मंदिर चौक, बाजारपेठ, खटपट नाका, बसस्थानक, नवलेवाडी फाटा, सारडा पेट्रोल पंप अशा मोक्याच्या ठिकाणी फलक लावून अकोले तालुक्यातील ग्राहकांना आपल्याच तालुक्यात खरेदी करावी असे आवाहन केले आहे. या फलकावर माझे गाव.. माझे दुकान.., आपली खरेदी अकोले तालुक्यातच, विसरू नका आपली माती.. आपली माणसं.. अशा आशयाचा मजकूर छापलेला आहे. यासाठी अकोले शहरातील व्यावसायिक भारत पिंगळे, विक्रम नवले, संदेश धुमाळ, सचिन आवारी, सतीष वाकचौरे, गौरव मैड, मयूर रासने, समीर सय्यद आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांनी पुढाकार घेतला आहे.
