लढवय्यी शेतकरी कन्या शर्मिला येवले शिंदे गटाच्या वाटेवर युवासेनेच्या प्रदेश सहसचिव पदाला स्थगिती दिल्याने नाराज


नायक वृत्तसेवा, अकोले
विद्यार्थी संघटना आणि शेतकरी आंदोलनातून पुढे आलेली युवा कार्यकर्ती, अकोलेतील शेतकरी कन्या शर्मिला सुभाष येवले आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. ठाकरे गटाच्या युवासेनेत त्या सहसचिव होत्या. मात्र, या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. यावर नाराजी व्यक्त करताना येवले यांनी म्हटले की, ‘पक्षाला कार्यकर्त्यांची गरज असते कार्यकर्त्याला पक्षाची नाही.

गेल्या काही काळापासून शिवसेनेत महिला पदाधिकार्‍यांच्या बाबतीत बर्‍याच घडामोडी सुरू आहेत. युवासेनेतही घडामोडी सुरू असून वरुण सरदेसाई यांनी सावरण्याचा प्रयत्न करूनही फारसे यश येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येवलेंसारखे काही नाराज पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2021 पासून युवा सेनेते प्रदेश सहसचिव असलेल्या येवले यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना येवले यांनी म्हटले की, ‘माझ्यासारख्या ग्रामीण भागातील युवतीला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी दिली, पद दिलं ग्रामीण भागात शिवसेना युवासेना वाढीसाठी मला प्रयत्न करता आला. आता माझ्या पदाला स्थगिती दिल्याची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. पदाला स्थिगिती दिली असली तरी मी माझं काम चालूच ठेवले. पक्षाला कार्यकर्त्यांची गरज असते, कार्यकर्त्याला पक्षाची नाही. कार्यकर्ता हा सर्वसामान्य कुटुंबातून सर्व परिस्थितीची जाण ठेवून घडत असतो. मात्र कार्यकर्त्यांचं खच्चीकरण जर होत असेल तर पदत्याग केलेला काय वाईट,’ असे बोलून येवले यांनी युवासेना सोडण्याचे संकेत दिले आहेत. शर्मिला येवले अकोले तालुक्यातील इंदोरी येथील आहे. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यात झाले. विद्यार्थी संघटनेत काम केले. वडील प्रगतिशील शेतकरी आहेत. शेतात वडिलांसोबत अनेकदा शेतीत काम केले. प्रभावी भाषण शैली असल्याने मराठा क्रांती मोर्चात भाषण केले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेवर नियुक्ती झाली. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलनात भाग घेतला.

मात्र, त्यानंतर थेट 2019 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक केल्यानंतर चमकल्या. सप्टेंबर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी अकोले तालुक्यात त्यांच्या ताफ्यावर शाई फेकली होती. सरकारचे महापोर्टल बंद करावे, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या करीत येवले यांनी शाईचा फुगा मुख्यमंत्र्यांचा ताफ्यातील वाहनांच्या दिशेने फेकला होता. याप्रकरणी शर्मिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे चर्चेत आलेल्या येवले यांना ऑक्टोबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. यासाठी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पुढाकार धेतला होता. पुढे युवासेनेचे पद मिळाले. मधल्या घडामोडीतही त्या ठाकरे यांच्या गटासोबत राहिल्या. आता मात्र शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Visits: 150 Today: 2 Total: 1103238

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *