संगमनेर मर्चंट्स बँक निवडणुकीत व्यापारी एकताची विजयी सलामी! अनाठायी खर्च टाळून निवडणूक बिनविरोध करण्याची सभासदांमधून वाढती मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणार्या संगमनेर मर्चंट्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत छाननीनंतर 39 उमेदवारांचे 56 अर्ज शिल्लक राहिले आहेत. एकूण सतरा संचालकांना निवडण्यासाठी जाहीर झालेल्या या निवडणुकीत उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी एकता पॅनलचे उमेदवार राजेंद्र कारभारी वाकचौरे अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत सोळा जागांसाठी पुढील महिन्यात 17 जून रोजी मतदान होणार आहे. मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने चौफेर प्रगती साधली आहे. निवडणुकांच्या माध्यमातून होणारा अनाठायी खर्च आणि त्यातून परस्परांविषयी निर्माण होणारी कटुता टाळून यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी आता सभासदांमधूनच होवू लागली आहे.
पुढील महिन्यात 17 जून रोजी मतदान होणार्या संगमनेर मर्चंट्स बँकेच्या संचालक मंडळासाठी बुधवारी (ता.17) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत 17 संचालकपदासाठी एकूण 39 उमेदवारांनी 56 अर्ज दाखल केले होते. आज (ता.18) दाखल अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यातील अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघाच्या एका जागेसाठी व्यापारी एकता पॅनलचे उमेदवार राजेंद्र कारभारी वाकचौरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत व्यापारी एकताने विजयी सलामी दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.
उद्योगपती (स्व.) ओंकारनाथ मालपाणी यांनी 1965 साली आपल्या काही सहकार्यांसह संगमनेर मर्चंट्स बँकेची स्थापना केली होती. संगमनेरातील व्यापार-उदीमाची भरभरभराट व्हावी या हेतूने स्थापन झालेल्या मर्चंट बँकेने गेल्या सहा दशकांत संगमनेर व अकोले तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले. कोणत्याही सार्वजनिक संस्थेचे काम करतांना संचालकांची भूमिका विश्वस्तांप्रमाणे असावी असा दंडकही स्वर्गीय मालपाणी यांनी सुरुवातीपासूनच रुजविल्याने संस्थेला आर्थिक शिस्त लागून संगमनेर मर्चंट्स बँक संगमनेर-अकोलेकरांच्या जिव्हाळ्याची बनली. गेल्या दोन दशकांपासून उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने प्रगतीची गरुड झेप घेतली असून जिल्ह्यातील अग्रगण्य आर्थिक संस्थांमध्ये बँकेचा समावेश झाला आहे.
छाननीनंतर मर्चंट्स बँकेच्या संचालकपदासाठी विद्यमान 11 जणांसह 38 जणांचे 55 अर्ज शिल्लक राहिले असून येत्या 2 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बँकेच्या सभासदांमधून संपूर्ण निवडणूकच बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या नेतृत्वात गेल्या दोन दशकांत बँकेचा सर्वांगीण विकास झाला असून शिस्तशीर कारभार आणि सभासद व ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य यातून संस्थेने मोठी प्रगती साधली आहे. आर्थिक संस्थांमध्ये राजकारण विरहित कामकाज असावे अशी संस्थापकांची धारणा असल्याने सभासदांमधून आता त्याचीच आठवण करुन दिली जात आहे. त्यातूनच निवडणुकीसाठी होणारा जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विद्यमान संचालक मंडळासह इच्छुकांनी पुढाकार घेण्याची अपेक्षाही आता व्यक्त होत आहे.
निवडणूक जाहीर होवून प्रत्यक्ष मतदानाला अद्याप महिन्याचा कालावधी असल्याने या प्रक्रियेत उमेदवार, त्यांचे सहकारी आणि संस्थेचे कर्मचारी यांचा मूल्यवान वेळ खर्ची होणार आहे. शिवाय समर्पित वृत्तीने काम करणार्या संचालकांच्या अभावाने गेल्या काही वर्षात देशातील अनेक मोठ्या बँका व आर्थिक पेढ्या डबघाईला आल्याची असंख्य उदाहरणे असताना कटाक्षाने आर्थिक शिस्त पाळणार्या आणि प्रगतीपथावर असलेल्या संगमनेर मर्चंट्स बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा मतप्रवाह सभासदांमध्ये निर्माण झाला असून निवडणूक टाळण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
प्रगतीपथावरील संस्थांमध्ये काम करण्यासाठी सगळेच इच्छुक असतात. मात्र संचालक मंडळाला संख्येची मर्यादा असल्याने प्रत्येकालाच संधी मिळू शकत नाही. अशावेळी व्यापारी एकता पॅनलचे प्रमुख राजेश मालपाणी यांनी पुढाकार घेत जुन्या-नव्याचा समन्वय साधून यावर्षी होवू घातलेली संगमनेर मर्चंट्स बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही सभासदांमधून व्यक्त केली जात आहे. व्यापारी एकता पॅनलकडूनही त्यादृष्टीने पावलं उचलली गेली असून यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी जुन्या-नव्यांचा समन्वय साधून व बँकेचे हित लक्षात घेवून सतरा उमेदवारांची नावे निश्चित केली जात आहेत.
संगमनेरची अर्थवाहिनी असलेल्या संगमनेर मर्चंट्स बँकेच्या संचालक मंडळासाठी आता 16 जागांसाठी एकूण 38 जणांचे अर्ज दाखल असून त्यात सर्वसाधारण गटाच्या बारा जागांसाठी 21 उमेदवारांचे 29 अर्ज, महिला प्रतिनिधी गटाच्या दोन जागांसाठी पाच उमेदवारांचे सात अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटाच्या एका जागेसाठी सात जणांचे 11 अर्ज, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी पाच जणांचे आठ अर्ज तर अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेल्या एका जागेवर राजेंद्र कारभारी वाकचौरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आर्थिक संस्थांमध्ये राजकारण नसावे या धोरणाचा दिवंगत उद्योगपती व मर्चंट्स बँकेचे संस्थापक ओंकारनाथ मालपाणी यांनी नेहमी पुरस्कार केला. म्हणूनच मर्चंट्स बँकेने प्रगतीची घोडदौड करताना आर्थिक शिस्त असलेल्या राज्यातील मोजक्या आर्थिक संस्थांच्या पंक्तित आपले स्थान निर्माण केले. मालपाणी यांच्या त्याच विचारांची आठवण करुन देत आता सभासदांमधूनच यंदाची निवडणूक बिनविरोध करुन आदर्श निर्माण करण्याचे आवाहन होवू लागले असून त्याला इच्छुक उमेदवारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.