राजकीय स्टंटबाजी नाकारीत नागरिकांनीच उचलले आंदोलनाचे हत्यार! स्थानिकांकडूनही ‘फास्ट टॅग’ वसुली; बुधवारी ‘आम्ही संगमनेरकर’ टोलनाक्यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपुरी कामे, रस्त्याची चाळण, सुविधांची मारामार तरीही सक्तीची ‘वसुली’ असे सूत्र असलेल्या हिवरगाव पावसा टोलनाका प्रशासनाविरोधात संगमनेरकरांची सहनशीलता आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी काही पक्ष व संघटनांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर आंदोलनांचा ‘शो’ करुन आपल्या तुंबड्या भरल्याची काही उदाहरणे असल्याने चळवळींचा इतिहास लाभलेल्या संगमनेरकरांनी यावेळी मात्र ‘आम्ही संगमनेरकर’ अशा बॅनरखाली बिगर राजकीय आंदोलनाची तयारी सुरू केली असून येत्या बुधवारी (ता.8) थेट हिवरगाव पावसा टोलनाक्यावर धडक दिली जाणार आहे.

जवळपास पाच वर्ष नूतनीकरणाचे काम चाललेला पुणे-नाशिक महामार्ग 2017 साली 70 टक्के पूर्णत्त्वाच्या नियमावर टोल वसुलीसह सुरू झाला. त्यानंतरच्या कालावधीत ठेकेदार असलेल्या मॉन्टोकार्लो कंपनीने संगमनेर तालुक्यातून जाणार्या जवळपास 50 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. मात्र टोल वसुलीसह हा महामार्ग सुरू होवून चार वर्षांहून अधिक लोटूनही ठेकेदाराने या कामांकडे दुर्लक्ष केले असून अनेक ठिकाणचे उपरस्ते (सर्व्हिसरोड) चक्क गिळून टाकले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या लगत असलेल्या वाड्या-वस्त्यांकडे जाण्यासाठी नागरिकांनी धोकादायकरित्या महामार्ग ओलांडण्याची वेळ आली आहे.

या अपुर्या कामांमूळे महामार्गावरील अपघातांमध्येही मोठी वाढ झाली असून आत्तापर्यंत अनेक निष्पापांचे बळीही गेले आहेत. ठेकेदार कंपनीने नाशिकहून संगमनेरकडे येतांना कोल्हार-घोटी राज्यमार्गावर खाली उतरण्याचा रस्ताच गिळून टाकल्याने वाहनधारकांना चुकीच्या पद्धतीने आपला व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून अकोले रस्त्यावर खाली उतरावे लागते. यामुळे गेल्या चार वर्षात मालपाणी स्क्वेअरजवळ धोकादायक वळण घेतांना अनेक वाहनांना भिषण अपघात झाले असून त्यात अनेकांचा बळी जाण्यासह गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या ठेकेदार कंपनीला अजूनही नागरी जीवाची किंमत समजली नसल्याने हा महामार्ग सुरु करतांना जी स्थिती होती, त्यात आजही कोणताही बदल झालेला नाही.

विशेष म्हणजे महामार्गावर झालेल्या अशा प्रत्येक अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या संतापाचा वापर आपल्या तुंबड्या भरण्यासाठी झाल्याची अनेक उदाहरणे असून त्यात काही राजकीय पक्षांचे कथीत नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि काही पत्रकार सतत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. यातून गेल्या चार वर्षात झालेल्या विविध आंदोलनांना राजकीय किनार लागल्याने होत्या त्या समस्या कायम राहून, आंदोलनकर्त्यांची मात्र पोटं फुगल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे मागील काही काळापासून सर्वसामान्य नागरिक अशा आंदोलनांपासून दूर गेल्याने या महामार्गाच्या ठेकेदाराचे चांगलेच फावले आहे.

मॉन्टो कार्लो या कंपनीने 2017 साली महामार्ग सुरू करताना सरसकट टोल वसुलीचे सूत्रही राबविले होते. मात्र स्थानिकांनी त्या विरोधात आंदोलन उभे केल्यानंतर ठेकेदाराला त्यापुढे झुकावे लागले. तेव्हापासून स्थानिक असल्याचे ओळखपत्र दाखवणार्या सर्व वाहनांना हा मार्ग ‘टोल फ्री’ होता. मात्र सध्या याच कारणावरुन हिवरगाव पावसा येथील टोलनाका पुन्हा चर्चेत आला असून ओळखपत्र पाहून सोडून देण्यात आलेल्या वाहनाकडूनही ‘फास्ट टॅग’चा आधार घेवून ‘टोलधाड’ टाकली जात आहे. त्यामुळे संगमनेरात मोठा असंतोष खदखदू लागला असून त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आता दस्तुरखुद्द सामान्य माणूसच पुढे सरसावला आहे.

यासाठी काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘आम्ही संगमनेरकर’ या बॅनरखाली येत्या बुधवारी (ता.8) सकाळी 10 वाजता हिवरगाव पावसा टोलनाक्यावर धडक देण्याचा निर्णय घेतला असून स्थानिकांना मोफत प्रवासाची सुविधा असतांना सक्तिने टोल वसुली कशी केली जाते याचा जाब टोलनाका प्रशासनाला विचारला जाणार आहे. यावेळी पुणे-नाशिक महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला असून ठेकेदार कंपनीने रस्त्याची अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करावीत, संपूर्ण महामार्गाची दुरुस्ती करावी, बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरू करावेत व अपूर्ण राहिलेल्या उपरस्त्यांची (सर्व्हिस रोड) त्वरीत कामे पूर्ण करावी अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन राजकारणविरहीत नागरिकांनी नागरिकांसाठी करण्याचा निर्णय घेतला असून या आंदोलनात प्रत्येक संगमनेरकराने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झाल्यानंतर तो सुरु करण्यास व टोल वसुली करण्यास परवागनी मिळते. त्याच आधारावर पुणे-नाशिक महामार्गाच्या ठेकेदार कंपनीने 2017 साली टोल वसुलीसह हा महामार्ग सुरु केला. मात्र या गोष्टीला चार वर्षांचा कालावधी लोटूनही कंपनीने ना राहिलेली कामे पूर्ण केली, ना रस्त्याच्या देखभालीकडे लक्ष दिले. त्यामुळे प्रशस्त महामार्ग होवूनही सर्वसामान्यांचे जीव मात्र वाचू शकले नाहीत. आता तर संबंधित ठेकेदाराने चक्क स्थानिकांनाच मूर्खात काढण्यास सुरुवात केली असून ओळखपत्राच्या आधारावर मोफत सोडलेल्या स्थानिक वाहनधारकाच्या बँक खात्यातून ‘फास्ट टॅग’द्वारा परस्पर वसुली केली जात आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात प्रचंड संताप निर्माण झाला असून नागरिकांनीच आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.

